पूर्व लडाखमध्ये भारत-चीन नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणावर तणाव असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सर्वांसाठीच हा आश्चर्याचा धक्का होता. कारण पंतप्रधान मोदींच्या या लेह दौऱ्याची कुठलीही पूर्वकल्पना माध्यमांना देण्यात आलेली नव्हती.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल उंचावण्याबरोबरच तिथली परिस्थिती समजून घेणे, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश होता. पूर्व लडाखमध्ये पँगाँग टीएसओसह गलवान खोऱ्यावर दावा सांगणाऱ्या चीनसाठी सुद्धा हा एक सूचक इशारा आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे.
पंतप्रधान मोदींनी भेट दिलेल्या निमूबद्दल समजून घेऊया
– पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी निमू येथील पोस्टला भेट दिली.
– निमू हे समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर आहे. युद्धाच्या दृष्टीने विचार केल्यास हा अत्यंत खडतर, कठीण असा प्रदेश आहे. इथे ड्युटीवर तैनात असलेल्या सैनिकांना सुद्धा वेगवेगळया आव्हानांचा सामना करावा लागतो.
– निमूचा भाग हा सिंधु नदीच्या किनाऱ्यावर आहे. हा सर्व परिसर जंस्कारच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे.
– निमूमध्येच सिंधु आणि जंस्कार नदीचा संगम होतो. इथून सिंधु नदी पुढे उत्तर पश्चिमेला असलेल्या पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेने वाहत जाते.
– निमूच्याच भागामध्ये आलची गावामध्ये निमू-बाजगो हायड्रोइलेक्ट्रीक प्रकल्प उभारण्यात आलाय. भारताच्या या प्रकल्पाला पाकिस्तानने विरोध केला होता.
– लेहहून कारगिलच्या दिशेने जाताना मध्ये निमूचा प्रदेश लागतो.
– अक्साई चीन आणि पीओकेच्या दृष्टीने निमू सामरिकदृष्टया भारतासाठी खूप महत्वाचे आहे. हा खूप दुर्गम भाग आहे.