मागच्या नऊ आठवडयांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेले माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मागच्या २४ तासात वाजपेयींची प्रकृती गंभीर झाल्याचे एम्सकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली. मागच्या दोन महिन्यांपासून वाजपेयींवर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किडनी संसर्गामुळे ११ जूनला वाजपेयींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून मोदींनी एम्स रुग्णालयाला दिलेली ही चौथी भेट आहे.

मोदींच्या आधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुद्धा एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सुद्धा ११ ऑगस्टला रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली होती.

२००९ पासून अंथरुणाला खिळून असलेले अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत. डिमेंशिया म्हणजे स्मृतीभ्रंश. या आजारामध्ये वाढत्या वयानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होत जाते.

Story img Loader