PM Modi Visits Chief Justice DY Chandrachud House for Ganeshotsav : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मोदींनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले व बाप्पाची आरती देखील केली. मात्र, मोदींच्या या कृतीनंतर सरन्यायाधीशांवर व मोदींवरही टीका होऊ लागली आहे. ही भेट घटनाबाह्य असल्याची टीका विरोधक करू लागले आहेत. दरम्यान, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केलं. बापट म्हणाले, “माझ्या मते पंतप्रधानांनी अशा पद्धतीने सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक होती. देशाच्या लोकशाहीसाठी हे चांगलं चित्र नाही”.
उल्हास बापट म्हणाले, “कोणत्याही न्यायाधीशांनी कुठल्याही खटल्यातील व्यक्तीशी संबंध ठेवता कामा नये. सध्या आपल्या सरन्यायाधीशांपुढे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार अपात्रतेचे खटले चालू आहेत. या दोन्ही खटल्यांमध्ये भारतीय जनता पार्टी देखील आरोपीच्या पिंजऱ्यात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांनी मोदींना त्यांच्या घरी बोलावणं कुठेतरी घटनात्मक औचित्यभंग होत असल्याची स्थिती आहे”.
“घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती निवृत्तीनंतर पंतप्रधानांच्या सल्ल्याने व राष्ट्रपतींच्या आदेशानुसार इतर राजकीय अथवा घटनात्मक पद भूषवू शकतात. पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती या नियुक्त्या करत असतात. एखाद्या आयोगावर किंवा कोणत्याही घटनात्मक पदावर नियुक्त्या केल्या जातात. सर्वांना कल्पना आहे की आपले सरन्यायाधीश दोन महिन्यांनी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना अशी पदं मिळू शकतात, अशी भावना लोकांच्या मनात आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांनी काळजीपूर्वक व शिष्टाचाराला धरून वागलं पाहिजे”, असं उल्हास बापट यांनी नमूद केलं.
हे ही वाचा >> Farooq Abdullah : “भारताने तेव्हा तीन दहशतवाद्यांना सोडलं अन् आता…”, IC814 विमान अपहरणावर फारुक अब्दुल्लाह पहिल्यांदाच बोलले
मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं माझ्या मते चुकीचं आहे : उल्हास बापट
घटनातज्ज्ञ बापट म्हणाले, “सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावू नये असं राज्यघटनेत लिहून ठेवलेलं नाही. परंतु, काही प्रथा, परंपरा असतात, त्या आपण पाळल्या पाहिजेत. एखाद्या खटल्यात गुंतलेल्या व्यक्तीशी न्यायाधीशांनी संबंध ठेवू नयेत. त्यामुळे पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं माझ्या मते चुकीचं आहे”.
हे ही वाचा >> Video: “क्रोनोलॉजी समजून घ्या..”, पंतप्रधान मोदी – सरन्यायाधीश चंद्रचूड गणपती दर्शनावर संजय राऊतांची खोचक टीका
पंतप्रधान व सरन्यायाधीशांनी लोकशाही जपावी : बापट
बापट म्हणाले, सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं होतं की पंतप्रधान स्वतःहून सरन्यायाधीशांच्या घरी गेले होते ही गोष्ट आपल्याला तपासावी लागेल. परंतु, सरन्यायाधीशांनी त्यांना बोलावलं नसेल तर सरन्यायाधीशांमध्ये मोदींना त्यांची चूक सांगण्याचं धारिष्ट्य असलं पाहिजे. सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना सांगितलं पाहिजे की तुम्ही मला भेटायला येणं घटनेनुसार योग्य ठरणार नाही. भारताच्या लोकशाहीसाठी सरन्यायाधीशांची अशी भूमिका गरजेची आहे. आपली लोकशाही जपणं हे पंतप्रधान व सरन्यायाधीश या दोघांचंही कर्तव्य आहे.