कर्नाटक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. पण भाषेच्या समस्येमुळे भाजपाच्या अडचणीत वाढत चालल्या आहेत. गुरुवारी कर्नाटकच्या देवनागिरी जिल्ह्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेमध्ये ट्रान्सलेटरने मोठी चूक करुन भाजपाचीच पंचाईत केली.

या सभेमध्ये अमित शहांचे हिंदीतील भाषण कन्नडमध्ये ट्रान्सलेट करताना प्रल्हाद जोशी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित, गरीब आणि मागासांसाठी काही करणार नाहीत. ते देशाचे नुकसान करणार, त्यांनाच मतदान करा. खरतंर अमित शहा असं म्हणाले होते कि, सिद्धारामय्या सरकारने कर्नाटकचा विकास केलेला नाही. तुम्ही पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेऊन येडियुरप्पांना मतदान करा. आम्ही कर्नाटकाला देशातील उत्तम राज्य बनवू. पण प्रल्हाद जोशी यांनी ट्रान्सलेट करताना अर्थाचा अनर्थ केला.

अमित शहा यांच्याबरोबर कर्नाटकमध्ये असे पहिल्यांदा घडलेले नाही. शहा यांनी एका पत्रकारपरिषदेला संबोधित करताना विरोधकांना भ्रष्ट म्हणण्याऐवजी येडियुरप्पांना भ्रष्टाचारी म्हटले होते. त्यावेळी शेजारी बसलेल्या नेत्यांने त्यांना चूक लक्षात आणून दिली. भ्रष्टाचारासाठी स्पर्धा झाली तर येडियुरप्पा सरकारला भ्रष्टाचारामध्ये नंबर एकचा पुरस्कार मिळेल असे अमित शहा म्हणाले होते. शहा यांनी चुकीने हे विधान केले पण त्यामुळे काँग्रेसला टीका करण्याची आयती संधी मिळाली. कर्नाटक काँग्रेसने लगेचच येडियुरप्पांनी सर्वाधिक भ्रष्ट सरकारचे नेतृत्व केले हे शहांना सुद्धा मान्य आहे असे टि्वट केले होते.