पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने विविध दौऱ्यांवर असतात. त्यांचे परदेशी दौरेही तितकेच गाजतात. सध्या भारतात निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. कर्नाटकात निवडणुका लागल्या आहेत. तर, येत्या काही महिन्यांत देशभरात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकांआधीच त्यांनी दौऱ्यांना सुरुवात केली आहे. असाच दौरा आजपासून सुरू झाला आहे. अवघ्या ३६ तासांत ते तब्बल ५ हजार ३०० किमीचा दौरा करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याची सर्वत्र चर्चा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या विविध दौऱ्यांमध्ये व्यस्त असणार आहेत. ३६ तासांत ते जवळपास ५ हजार ३०० किमीचा प्रवास करणार आहेत. या प्रवासात ते सात शहरांमध्ये आठ कार्यक्रमांना हजेरी लावणार असून महत्त्वाच्या बैठकाही घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशात पोहोचले असून त्यानंतर तेथून दक्षिणेकडील केरळ आणि मग पश्चिमेतील दादरा नगर हवेली येथेही ते भेट देणार आहे. या तीन राज्यातील दौऱ्यांनंतर ते उद्या, २५ एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत परततील.
हेही वाचा >> Video: राहुल गांधींनी कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलनानंतर हात पुसले? भाजपानं व्हायरल केला व्हिडीओ; टीका-टिप्पणीला सुरुवात!
आज सकाळीच ते मध्य प्रदेशातील रिवा येथे पोहोचले. यासाठी त्यांनी दिल्ली ते खजुराहो असा ५०० किमीचा प्रवास केला. राष्ट्रीय पंचायती राज दिनाकरता ते रिवाला भेट देणार आहेत. हा कार्यक्रम झाल्यावर ते काजुराहोला परत येऊन केरळातील कोचीपर्यंत प्रवास करणार आहेत. जवळपास १७०० किमीचा प्रवास केल्यानंतर ते युवम कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होणार आहेत.
उद्याचंही शेड्युल ठरलं
२५ एप्रिल रोजी ते १९० किमीचा प्रवास करून कोचीहून तिरुअनंतपुरम येथे जाणार आहेत. येथून ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असून, काही विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. हे कार्यक्रम पार पडले की पंतप्रधान नरेंद्र मोदी नमो मेडिकल कॉलजेला भेट देणार आहेत. तसंच सिल्वासा येथे जाऊन अनेक विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. या दौऱ्यात ते दिव-दमणलाही ते भेट देणार असून येथून ते सुरतपर्यंत ११० किमीचा प्रवास करतील. सुरत दौरा झाला की ते ९४० किमीचा प्रवास करून पुन्हा दिल्लीत परतणार आहेत.