PM Narendra Modi In US Visit : तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी डेलावेयर येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी क्वाड शिखर परिषदेतही सहभाग घेतला. यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी क्वाडचे महत्त्व आणि त्याची उपयुक्तता यावर भर दिला. तसेच क्वाड देशांचे एकत्र येणं हे मानवतेसाठी अतिशय आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं.
क्वाड परिषदेत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“माझ्या तिसऱ्या कार्यकाळात मी क्वाड शिखर परिषदेत सहभागी होतो आहे, याचा मला आनंद आहे. २०२१ ची पहिली क्वाड परिषद अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. अमेरिकेने कमी कालावधीत या परिषदेला प्रत्येक प्रकारचं सहकार्य केलं आहे. या परिषदेत अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अमेरिकेच्या क्वाडमधील योगदानाबाबत मी त्यांचे मनापासून आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.
हेही वाचा – तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत वाढ; नेमकं कारण काय?
पुढे बोलताना,“क्वाड परिषदेची बैठक अशा वेळी होते आहे, जेव्हा जगात तणाव आणि संघर्ष उद्भवलेला आहे. अशा परिस्थितीत लोकशाही मूल्यांच्या आधारावर क्वाडने एकत्र काम करणे मानवतेसाठी खूप आवश्यक आहे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आम्हाला आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था, प्रादेशिक अखंडता आणि इतर सर्व समस्यांचे शांततापूर्ण निराकरण हवं आहे”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. याशिवाय “मुक्त आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेश हे आमचं लक्ष्य आहे. आरोग्य, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि हवामान बदल यांसारख्या विषयांवर आम्ही सकारात्मक पद्धतीने काम केलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं”, असंही त्यांनी नमूद केलं.
क्वाड परिषद काय आहे?
‘क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’ (क्वाड) ही अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमधील धोरणात्मक युती आहे. या युतीची स्थापना २००७ साली झाली होती. तज्ज्ञांच्या मते, ‘क्वाड’च्या निर्मितीचे मुख्य अघोषित उद्दिष्ट आशिया-पॅसिफिक प्रदेशात म्हणजेच हिंद महासागर आणि प्रशांत महासागरादरम्यान येणाऱ्या सागरी क्षेत्रावरील चीनच्या वाढत्या प्रभावाला लगाम घालण्याचं आहे. त्याचवेळी, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांना चिनी वर्चस्वापासून वाचवणे हा या युतीमागील मुख्य उद्देश आहे. याशिवाय क्वाड केवळ सुरक्षिततेवरच लक्ष केंद्रित करत नाही तर आर्थिक ते सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा, मानवतावादी मदत, आपत्ती निवारण, हवामान बदल, महामारी आणि शिक्षण यासारख्या इतर जागतिक समस्यांवर देखील लक्ष केंद्रित करते.