पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये भारतीय नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिथल्या भारतीयांकडून मिळालेला स्नेह आणि प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले. मॉस्कोत आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, “मी इथे येताना एकटा आलेलो नाही. मी माझ्याबरोबर काही गोष्टी घेऊन आलोय. मी माझ्याबरोबर भारतातल्या मातीचा गंध घेऊन आलोय, तुमच्यासाठी १४० कोटी भारतीयांचं प्रेम घेऊन आलोय. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर हा माझा परदेशातील भारतीय समुदायाशी पहिलाच संवाद आहे. हा खूप आंनदायी क्षण आहे. आज ९ जुलै असून मला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आज बरोबर एक महिना झाला आहे. मी आज तुम्हा सर्वांसमोर ठामपणे सांगेन की, माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकद लावून काम करेन. आधीपेक्षा तिप्पट वेगाने काम करेन. देशाचा विकास वेगाने करण्याची मी शपथ घेतली आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आपल्या सरकारने जी उद्दीष्टे ठेवली आहेत त्यामध्येही तीन हा अंक सातत्याने दिसतो, हा एक योगायोगच आहे. माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचं आहे. देशातील गरिबांसाठी तीन कोटी घरं बांधण्याचं आमचं लक्ष्य आहे. तसेच देशात तीन कोटी ‘करोडपती दिदी’ (कोट्यधीश भगिनी) बनवायच्या आहेत. तुमच्यासह (परदेशातील भारतीय) संपूर्ण जगाने पाहिलं आहे की भारताने एखादं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय भारत मागे हटत नाही. भारत तो देश आहे जो चांद्रयान चंद्रावर पोहोचवतो, जिथे जगातला कुठलाच देश पोहोचला नाही तिथे आपलं यान पोहोचवतो, डिजीटल ट्रान्झॅक्शनच्या क्षेत्रातही भारत एक विश्वासार्ह देश बनला आहे.”
“आव्हानांना आव्हान देणं माझ्या डीएनएमध्ये”
मोदी म्हणाले, गेल्या १० वर्षांमध्ये भारताने विकासाचा जो वेग पकडला आहे तो पाहून जगालाही आश्चर्य आणि हेवा वाटू लागला आहे. जगभरातील लोक हल्ली भारतात येतात तेव्हा म्हणतात की भारत आता बदलू लागाला आहे. भारतातलं नवनिर्माण ते पाहू शकतात. भारत बदलतो आहे कारण देशाचा आपल्या १४० कोटी नागरिकांवर विश्वास आहे. १४० कोटी भारतीयांनी आपल्या देशाला विकसित बनवण्याचं स्वप्न पाहिलं आहे आणि सर्वजण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. १४० कोटी भारतीय नागरिक प्रत्येक क्षेत्रात इतरांना मागे टाकून पुढे जाण्याची तयारी करत आहेत. तुम्ही पाहिलं असेल की आम्ही भारताची अर्थव्यवस्था कशा पद्थतीने करोनाच्या संकटातून बाहेर काढली. आम्ही केवळ त्या संकटातून बाहेर पडलो नाही तर आपली अर्थव्यवस्था जगातील विकसित देशांच्या पंक्तीत नेऊन बसवली आहे. हे सगळं शक्य झालं कारण आव्हानांना आव्हान देणं माझ्या गुणसुत्रात (डीएनए) आहे.
© IE Online Media Services (P) Ltd