पीटीआय, कीव्ह

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या युद्धावर अंतिम उपाय शोधण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करणे आवश्यक असल्याची भारताची भूमिका आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना सांगितले. पंतप्रधान मोदी शुक्रवारी युक्रेनच्या दौऱ्यावर पोहोचल्यानंतर दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय संबंध तसेच युक्रेन युद्धावर विस्तृत चर्चा झाली.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या चर्चेविषयी माहिती देताना सांगितले की, चर्चेतील बराचसा भाग द्विपक्षीय संबंधांबद्दल होता. तसेच, रशिया-युक्रेन युद्धाबद्दलही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मोदी यांच्या पहिल्याच युक्रेन दौऱ्याचे वर्णन भारताकडून ‘ऐतिहासिक भेट’ असे करण्यात आले आहे. व्यापक प्रमाणात स्वीकार्यता, युद्धग्रस्त प्रदेशात शांतता व स्थैर्य यासाठी योगदान यासाठी कल्पक उपाय विकसित करण्यात सर्व संबंधितांनी सहभाग घेण्याची गरज आहे असे मोदींनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. युक्रेनमध्ये शांतता लवकर नांदण्यासाठी भारत योगदान तयार करण्यास तयार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

हेही वाचा >>>Bus Accident : ४० भारतीयांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली, मदत आणि बचावकार्य सुरु

दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या तपशीलवार, खुल्या आणि रचनात्मक चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी या युद्धाच्या परिणामाबद्दल ‘ग्लोबल साउथ’मध्ये व्यापक प्रमाणात चिंता व्यक्त केली जात असल्याचे झेलेन्स्की यांच्या कानावर घातली. तसेच, मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. प्रत्यक्ष युद्धाची परिस्थिती आणि राजनैतिक चित्र यांच्याबद्दल झेलेन्स्की यांचे काय मूल्यमापन आहे याबद्दल मोदींनी विचारणा केली. त्यावर, झेलेन्स्की यांनी त्याबद्दल माहिती दिली. तसेच, जागतिक शांतता शिखर परिषदेत भारताने सतत सहभागी असावे अशी युक्रेनची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरी जागतिक शांतता शिखर परिषद भारतात?

दुसरी जागतिक शांतता शिखर परिषद भारतात आयोजित करण्यासाठी उत्सुक असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मी भारताला भेट देण्याची योजना आखत आहे. भागीदारी, सामरिक भागीदारी सुरू झाल्यावर आणि संवाद सुरू झाल्यावर फार वेळ दवडून चालणार नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांची पुन्हा भेट घ्यायला आवडेल असे सांगतानाच, ही भेट भारतात झाली तर आनंदच आहे, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. त्या निमित्ताने भारतीयांशी संपर्क साधता येईल, शांततेसाठी ते महत्त्वाचे आहे असे मत झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. पहिली जागतिक शांतता शिखर स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. युक्रेनमध्ये युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करणे हाच या परिषदेचा मुख्य हेतू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi advice to ukraine russia for a solution to the war amy