उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन महानगरपालिका क्षेत्रात एका सफाई कर्मचाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचरा गाडीत टाकल्यामुळे त्याच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचरा गाडीमध्ये घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. हे फोटो अगोदरच कचऱ्यामध्ये होते, असा दावा या सफाई कर्मचाऱ्याने केला आहे.
हेही वाचा>>> योगींनी उद्घाटन केलेल्या लखनौमधील मॉलमध्ये हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न, २० जणांवर पोलीस कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील मथुरा-वृंदावन महानगरपालिका क्षेत्रातील सुभाष उच्च माध्यमिक महाविद्यालय परिसरात नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचऱ्यात टाकण्यात आले होते. सफाई करत असताना पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने हे फोटो कचरा गाडीत टाकून दिले. मात्र कचरा गाडी घेऊन जाताना त्याला काही लोकांनी पाहिले. त्याला याबद्दल विचारले असता, फोटो अगोदरच कचऱ्यामध्ये फेकून दिलेले होते, असे स्पष्टीकरण त्याने दिले.
हेही वाचा>>>शारजाहहून हैदराबादला येणारं इंडिगो विमान पाकिस्तानातील कराचीला वळवलं
आक्षेप घेतल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याने हे फोटो लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो कचारा गाडीत घेऊन जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. परिणामी येथील अतिरिक्त महापालिका आयुक्त सत्येंद्र तिवरी यांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.