PM Narendra Modi And Elon Musk : फेब्रुवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क याची अमेरिकेत भेट झाली होती. या भेटीनंतर टेस्ला कंपनी भारतात मोठी रोजगार निर्मिती करणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता त्यातील पुढचं पाऊल म्हणजे मोदी आणि एलॉन मस्क यांच्यात पुन्हा एकदा फोनवरून चर्चा झाली असून तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातील कामाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर म्हणाले, “मी आज एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला असून वॉशिंग्टनच्या भेटीत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती, त्यावर संवाद साधण्यात आला. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या प्रचंड क्षमतेवर आम्ही चर्चा केली. भारत या क्षेत्रात अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यास पूर्णपणे तयार आहे.”

फेब्रुवारी महिन्यात एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर एलॉन मस्क भारतात मोठी नोकरभरती करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्यांनी कस्टमर सर्व्हिस आणि बॅकएंड पदांसाठी भरती सुरू केली होती. यापैकी पाच पदे मुंबई आणि दिल्ली या महत्त्वाच्या शहरांमधून भरण्यात येणार होती. या नोकरभरतीच्या वृत्तानंतर एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकने भारती एअरटेल आणि जिओबरोबर करार केला होता. त्यानुसार  एअरटेलने भारतातील ग्राहकांसाठी स्टारलिंकची हाय-स्पीड इंटरनेट सेवा आणण्यासाठी एलॉन मस्कच्या स्पेसएक्ससोबत करार केला आहे. एअरटेलने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतातील हा पहिला करार आहे. यामुळे स्पेसएक्सला भारतात स्टारलिंकची उपकरणे विकण्यासाठी परवानगी देण्यात आली.

या दोन्ही वृत्तांनंतर आता मोदींनी पुन्हा एकदा मस्क यांच्याशी संवाद साधल्याने लवकरच भारतात मस्क यांचा नवा उपक्रम सुरू होणार असल्याची किंवा टेस्लाची भारतातील एन्ट्री पक्की झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.