जपानच्या हिरोशिमा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची शनिवारी भेट झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये संवाद झाला. अजूनही रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध संपलेलं नाही. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेलेंस्कीशी फोनवरुन चर्चा केली होती. आज मात्र हे दोन्ही नेते समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांशी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी झेलेंस्कींना काय म्हणाले?
युक्रेन आणि रशिया युद्ध हे मोठं प्रकरण आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. हा फक्त एक मुद्दा आहे अशी माझी धारणा नाही. माझ्यासाठी तर हे युद्ध म्हणजे अर्थव्यवस्था, राजकारण आणि माणुसकी यांच्यावर परिणाम करणारं आहे. भारत देश आणि मी युद्धावर काही तोडगा काढता येईल का? यासाठी तुम्हाला सहकार्य करु इच्छितो. युद्धाचं दुःख काय असतं ते तुम्हाला माहित आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या चर्चेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचीही उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी ७ समिटमध्ये सहभागी होण्यासाठी १९ तारखेलाच जपानच्या हिरोशिमामध्ये पोहचले आहेत. या समिटमध्ये जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट झाली. या दोन नेत्यांमधली गळाभेट चर्चेत आहे.
मागच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून रशिया विरुद्ध युक्रेन असं युद्ध सुरु झालं आहे. रशियाने एका विशेष सैन्य मोहिमेचं नाव देत युक्रेनवर हल्ला सुरु केला. युक्रेनवर हल्ला झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झेलेंस्की यांची ही पहिलीच भेट आहे. त्याआधी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी काहीवेळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन युद्धात हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.