तिरुवनंतपुरम : भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेद्वारे अवकाशात जाणाऱ्या चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्ण आणि विंग कमांडक शुभांशु शुक्ला अशी या चौघांची नावे आहेत. गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अवकाश उड्डाण मोहिमेंतर्गत या चौघांचे कठोर प्रशिक्षण सध्या सुरू आहे.
थुंबा येथे विक्रम साराभाई अवकाश केंद्रात पंतप्रधान मोदींनी या चौघांना पहिल्यांदा देशासमोर आणले आणि त्यांना मानाचे अंतराळवीर बॅज लावले. या चौघांचा उल्लेख पंतप्रधानांनी ‘चार शक्ती’ असा केला. ते म्हणाले की हे चौघे जण १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा अंतराळात नेणाऱ्या चार शक्ती आहेत. ४० वर्षांनंतर कोणी भारतीय अंतराळात जाणार आहे, पण यावेळी वेळही आपली आहे, उलटगणतीही आपली आहे आणि अवकाशयानही आपले आहे.
या कार्यक्रमावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनरई विजयन, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि इस्राोचे अध्यक्ष एस. सोमनाथ उपस्थित होते.
हेही वाचा >>> हिमाचल प्रदेशात काँग्रेस सरकार धोक्यात? आमदारांच्या पळवापळवीचा मुख्यमंत्री सुक्खूंचा आरोप
मोदी पुढे म्हणाले की, गगनयानात वापरलेली बहुतांश उपकरणे भारतात तयार झाली आहेत, हे समजल्यावर मला खूप आनंद झाला. योगायोगाने, भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी तयारी करत आहे आणि तेव्हाच भारताचे गगनयानही आपल्या अंतराळ क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. या अमृतकाळात भारतीय अंतराळवीर भारतीय रॉकेटमधून चंद्रभूमीवर पाय उतरवेल. भारत अवकाशक्षेत्रात नवे जागतिक व्यावसायिक हब होण्याच्या दृष्टीने प्रगती करत आहे. २०३५पर्यंत देशाकडे स्वत:चे अवकाश स्थानक असेल.
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर – १९७६ साली केरळमध्ये जन्म. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)चे माजी विद्यार्थी. अमेरिकेचे स्टाफ कॉलेज, तामिळनाडूचे वेलिंग्टन आणि तांबरमच्या एफआयएसमधून शिक्षण. ‘सोर्ड ऑफ ऑनर’चे मानकरी. वायूदलात १९९८ साली रुजू. कॅट ए फ्लाइंग इन्स्ट्रक्टर. तीन हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव. एसयू-३० एमकेआय, मिग -२१, मिग-२९, हॉक डॉर्निअर आणि एएन-३२ सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव.
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन – १९८२ साली चेन्नईतील जन्म. एनडीएचे माजी विद्यार्थी. राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि ‘सोर्ड ऑफ ऑनर’चे मानकरी. भारतीय वायूदलात जून २००३ मध्ये रुजू. २,९०० तासांचा उड्डाणाचा अनुभव. एसयू-३० एमकेआय, मिग -२१, मिग-२९, जॅग्वार, डॉर्निअर आणि एएन-३२ सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव.
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप – १९८२ साली प्रयागराज येथील जन्म. एनडीएचे माजी विद्यार्थी. भारतीय वायुदलात डिसेंबर २००४ मध्ये रुजू. २ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव. एसयू-३० एमकेआय, मिग -२१, मिग-२९, जॅग्वार, हाँक, डॉर्निअर आणि एएन-३२ सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव.
विंग कमांडर शुभांशु शुक्ला – १९८५ साली लखनौ येथे जन्म. एनडीएचे माजी विद्यार्थी. भारतीय वायुदलात जून २००६ मध्ये रुजू. २ हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव. एसयू-३० एमकेआय, मिग -२१, मिग-२९, जॅग्वार, हाँक, डॉर्निअर आणि एएन-३२ यांचा अनुभव.
कोण आहेत हे चार अंतराळवीर?
भारतीय वायूदलाचे चार लढाऊ वैमानिक महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना २ ते ३ हजार तास उड्डाणाचा अनुभव आहे. त्यापैकी दोघे ‘सोर्ड ऑफ ऑनर’ चे मानकरी आहेत.