संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनातला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे उद्या पार पडणारं बजेट, या अर्थसंकल्पात काय घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आजपासून अधिवेशनाला सुरुवात होईल, त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामं करावीत असंही आवाहन नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केलं.

देशाच्या जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल

आज श्रावणी सोमवार आहे, आजपासून एक महत्त्वाचं सत्र सुरु होतं आहे. मी देशवासीयांना शुभेच्छा देतो. आज संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. देश बारकाईने हे पाहतो आहे की अधिवेशन सकारात्मक पद्धतीने कसं पार पडेल. देशाच्या जनतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाया घालणारं हे अधिवेशन असेल, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले

भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्थसंकल्प

भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अधिवेशन आहे. मला, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी हा विषय अभिमानाचा आहे. कारण ६० वर्षांनी एक सरकार तिसऱ्यांदा परतलं आहे. तिसऱ्या वेळचं पहिला अर्थसंकल्प आम्ही मांडत आहोत. भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेचं हे रुप आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, मी देशाच्या जनतेला जी गॅरंटी दिली आहे त्या सगळ्या आश्वासनांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जात आहोत. हे बजेट अमृतकाळातलं महत्त्वाचं बजेट आहे. आम्हाला पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे, त्याची दिशा करणारं बजेट असेल. २०४७ ला जो भारत आहे त्याचा पाया घालणारं हे बजेट असणार आहे. असंही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

हे पण वाचा- लालकिल्ला: हिंदुत्व येईना कामाला, आव्हानांचा भार वाढीला

देशासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एक व्हा

आज भारतात पॉझिटिव्ह आऊटलूक, गुंतवणूक, परफॉर्मन्स हे सगळं एका उच्च आलेखावर आहे. भारताच्या विकासयत्रेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. माझं सगळ्या पक्षांच्या खासदारांना आवाहन आहे की जानेवारीपासून आम्ही जेवढं सामर्थ्य होतं तेवढी लढाई आपण लढली. जनतेला जे सांगायचं आहे ते सांगितलं. कोणी मार्ग दाखवला कुणी दिशाभूल केली. आता तो काळ संपला आहे. निवडून आलेल्या खासदारांचं कर्तव्य आणि जबाबदारी ही आहे की आता लढाई संपली असून येत्या पाच वर्षांत आपल्याला देशासाठी लढायचं आहे, एक आणि नेक बनून लढायचं आहे. पक्षापुरता मर्यादित विचार न करता देशाचा विचार करुन सगळ्यांनी एक व्हावं आणि देशाचा विचार केला. जानेवारी २०२९ मध्ये पुन्हा निवडणूक येईल तेव्हाचे सहा महिने काय करायचं आहे ते करा, पुन्हा मैदानात जा तोपर्यंत फक्त देशाच्या गरिबांचा, तरुणांचा विचार करा. जनतेचा आवाज व्हा. २०४७ मधल्या भारतासाठी आपण कटिबद्ध होऊ. असंही नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले काँग्रेसबद्दल?

आज दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं आहे की…

आज मला खूप दुर्दैवाने हे सांगावं लागतं आहे की २०१४ च्या नंतर काही खासदार ५ वर्षांसाठी निवडून आले, काही १० वर्षांसाठी. मात्र अनेक खासदारांना आपल्या क्षेत्राबाबत बोलता आलं नाही. कारण काही पक्ष नकारात्मक राजकारण करत होते. देशाच्या खासदारांचा अमूल्य वेळ काही पक्षांनी अपयश झाकण्यााठी केला. आता मी हे आवाहन करतो आहे की जे पहिल्यांदा निवडून आले आहेत त्यांना बोलण्याची संधी द्या, त्यांचे विचार ऐका. खासदारांना पुढे येऊन बोलण्याची संधी द्या. देशाच्या जनतेने आम्हाला कौल दिला, मात्र आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला. अडीच तास देशाच्या पंतप्रधानांना बोलू दिलं जात नाही. या गोष्टीचा त्यांना पश्चात्तापही नाही. मी आज आग्रहपूर्वक सांगतो आहे, आम्हाला देशाच्या जनतेने देशासाठी पाठवलं आहे, पक्षासाठी नाही. १४० कोटी देशाच्या जनतेसाठी आम्ही येथे आलो आहोत. देशाच्या जनतेचे मी धन्यवाद देतो असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे.