पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (८ डिसेंबर) उत्तराखंडमध्ये आयोजित दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारतासह जगभरातील गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या परदेशी गुंतवणुकीवर भाष्य केल. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, आम्ही या परिषदेसाठी आलेल्या गुंतवणूकदारांबरोबर २.५ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापर्यंत ४४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर यशस्वी बोलणी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देवभूमी उत्तराखंड तुम्हा सर्वांसाठी नवे दरवाजे उघडत आहे. भारताचा प्रगतीचा मंत्र घेऊन उत्तराखंड पुढे सरकत आहे. या महत्त्वकांक्षी भारताला स्थिर सरकार हवं आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आपण तेच पाहिलं आहे. लोकांनाही स्थिर आणि मजबूत सरकर हवं आहे. हीच गोष्ट उत्तराखंडच्या जनतेने आधीच दाखवून दिली आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडला परफेक्ट वेडिंग डेस्टिनेशन (विवाह करण्यासाठीचं उत्तम ठिकाण) म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी या देशातल्या धनाढ्य लोकांना सांगू इच्छितो की, लोकांची लग्न होतात, तेव्हा त्यांच्या जोड्या ईश्वराने बनवलेल्या असतात, असा आपला समज आहे. परंतु, मला एक गोष्ट कळत नाही की, देव लोकांच्या जोड्या बनवतो तर मग या जोड्या त्यांच्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी (डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी) परदेशात का जातात? ते इथे देवभूमीवर लग्न का करत नाहीत? देवाच्या दारात लग्न करण्याऐवजी परदेशात का जातात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मला असं वाटतं की, आपल्या देशांमधील तरुणांसाठी ‘मेक इन इंडिया’ योजना आहे. त्याचप्रमाणे ‘वेड इन इंडिया’ ही चळवळ सुरू व्हायला हवी. आपल्या देशातले धनाढ्य तरुण जगभरातल्या इतर देशांमध्ये जाऊन लग्न का करतात? आपल्या देशातल्या धनाढ्य लोकांमध्ये परदेशात जाऊन लग्न करण्याची फॅशन सुरू झाली आहे.

हे ही वाचा >> महाराष्ट्रातला नेता राजस्थानचा मुख्यमंत्री ठरवणार, भाजपाकडून पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती

इन्व्हेस्टर्स समिटमध्ये आलेल्या गुंतवणूकदारांना पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही सर्वचजण उत्तराखंडमध्ये गुंतवणूक करू शकाल असं नाही. काही जण गुंतवणूक करू शकणार नाहीत. परंतु, तुम्ही तो गुंतवणुकीचा विषय बाजूला सारा. कारण सगळ्यांनाच ते शक्य होणार नाही. परतु, मला वाटतं की येत्या पाच वर्षांमध्ये तुमच्या कुटुंबातील कमीत कमी एक डेस्टिनेशन वेडिंग उत्तराखंडमध्ये करा. एका वर्षांत ५,००० लग्नं जरी इथे होऊ लागली तरी नव्या पायाभूत सुविधा इथे उभ्या राहतील. जगभरातील लोकांसाठी हे एक मोठं वेडिंग डेस्टिनेशन बनेल. भारताकडे इतकी ताकद आहे की, आपण मिळून ठरवलं तर ते सहज शक्य होईल. कारण आपण तितके सामर्थ्यवान आहोत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi appeal to the youth to start wed in india movement destination wedding asc