PM Narendra Modi काँग्रेसने कायमच मुस्लिमांचं लांगुलचालन केलं आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. संसदेत ५० टक्के तिकिट द्यावं, ते जिंकून आले तर त्यांचं म्हणणं मांडतील. पण काँग्रेसला हे करायचं नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हरियाणातल्या हिस्सार या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

काँग्रेसला कुणाचं भलं झालं पाहिजे असं कधीही वाटलेलं नाही. मुस्लिमांचं भलं करावं असंही काँग्रेसला कधीच वाटलेलं नाही. काँग्रेसने कायम मुस्लिमांच्या लांगुलचालनाचं राजकारण केलं. पण त्यामुळे मुस्लिमांचा काहीही फायदा झालेला नाही उलट नुकसान झालं आहे. काँग्रेसने फक्त काही कट्टरपंथीय लोकांना खुश करण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे इतर समाज हाल अपेष्टाच सहन करत राहिला. अशिक्षित आणि गरीब राहिला. काँग्रेसच्या कुनीतीचं सर्वात मोठं उदाहरण वक्फ कायदा आहे. आता नव्या तरतुदींमळु वक्फच्या पवित्र भावनेचा सन्मान होईल. तसंच माझा काँग्रेसला सवाल आहे जर तुम्हाला मुस्लिमांचा कळवळा आहे तर मग तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुस्लिम व्यक्तीला का नेमत नाही? असा बोचरा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला आहे.

बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने अपमानित केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं. संविधानात त्यांनी सामाजिक न्यायाची व्यवस्था केली होती. त्यातही खंजीर खुपसून काँग्रेसने संविधानाच्या या तरतुदींना लांगूलचालणाचं माध्यम बनवलं. सत्ता लुटण्याचं करण्याचं एक हत्यार म्हणून काँग्रेसने संविधानाचा वापर केला. जेव्हा जेव्हा काँग्रेसला सत्तेचं संकट दिसलं तेव्हा तेव्हा त्यांनी संविधान पायदळी तुडवलं. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आत्म्याला नख लावलं. आपल्याच हाती सत्ता राहावी म्हणून त्यांनी हे केलं. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना सतत अपमानित केलं. त्यांचे विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

“आरक्षणाचे फायदे एससी/एसटी आणि ओबीसी समुदायांपर्यंत पोहोचले आहेत की नाही हे तपासण्याची काँग्रेसने कधीही तसदी घेतली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले”, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केला. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला. पण दुर्दैवाने काँग्रेस यालाही विरोध करत आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली.