जम्मू काश्मीरमधील महबुबा मुफ्तींचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक होणं अपेक्षित होतं. मात्र गेल्या सहा वर्षांपासून या राज्यात निवडणूक झालेली नाही. जून २०२० मध्ये भाजपाने मुफ्ती सरकारचं समर्थन काढून घेतलं आणि ते सरकार कोसळलं. महबुबा मुफ्तींचं सरकार कोसळल्यानंतर सहा महिने जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर २० डिसेंबर २०१८ पासून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सहा वर्षांपासून येथील जनता निवडणुका घेण्याची मागणी करत आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयाने यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. अशातच आज (१२ एप्रिल) त्यांनी जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी मोदी म्हणाले, जम्मू काश्मीरला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. यासह त्यांनी आणखी दोन मोठ्या घोषणा केल्या. मोदी म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक घेतली जाईल. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणूक घेण्याची मागणी करू लागले आहेत. त्याबाबत केंद्र सरकार आता अनुकूल असल्याचं मोदींच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.
उधमपूरमधील सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातल्या बहुसंख्य लोकांची परवा नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा वाटते. हे लोक श्रावण महिन्यात एका गुन्हेगाराच्या घरी जाऊन मटण शिजवतात, त्याचा व्हिडीओ शेअर करून देशातल्या जनतेला चिडवण्याचं, डिवचण्याचं काम करतात. आपला कायदा कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या आवडीचं जेवण करण्यापासून रोखत नाही. प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार शाकाहार अथवा मांसाहार खाण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु, इंडी आघाडीतल्या लोकांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. हे लोक श्रावणात मटण खाऊन त्याचे व्हिडीओ बनवून लोकांना दाखवतात. मुघलांच्या मानसितेतून हे लोक बाहेर पडलेच नाहीत.
हे ही वाचा >> मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
दरम्यान, मोदी यांनी काश्मीरबाबत मोठ्या घोषणा केल्या. ते म्हणाले, हा मोदी खूप मोठा विचार करतो, तो खूप दूरचा विचार करतो. त्यामुळे आतापर्यंत देशात जे काही झालंय, तुम्ही जे काही पाहिलंय तो केवळ ट्रेलर होता. मला नव्या जम्मू काश्मीरची नवी आणि शानदार प्रतिमा बनवायची आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा जम्मू काश्मीरमध्येदेखील विधानसभेची निवडणूक होईल. जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळेल. त्यानंतर तुम्ही (जम्मू-काश्मीरमधील रहिवासी) तुमच्या आमदार आणि मंत्र्यांबरोबर तुमची स्वप्नं शेअर करू शकता आणि ती पूर्ण करून घेऊ शकता. त्यानंतर प्रत्येक वर्गातील लोकांच्या समस्यांचं वेगाने समाधान केलं जाईल. येथे रस्ते आणि रेल्वेची जी कामं चालू आहेत ती अधिक वेगाने पूर्ण केली जातील. देश-विदेशातल्या मोठमोठ्या कंपन्या आणि कारखाने या राज्यात येतील आणि रोजगार निर्मिती होईल.