देशात हिंसक घटना घडल्या, की त्यावरून मानवाधिकारांचा मुद्दा चर्चेत येतो आणि आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा घटनांवर मानवाधिकार आयोग देखील भूमिका घेत असतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८व्या स्थापना दिवस कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधनपर भाषण केलं. यावेळी देशात घडणाऱ्या हिंसक घटना आणि त्यामध्ये होणाऱ्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. तसेच, अशा घटनांवरून आरोप किंवा टीका करणाऱ्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला.

राजकीय दृष्टीने पाहिलं तर मानवाधिकार..

दरम्यान, यावेळी मोदींनी मानवाधिकाराविषयी टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. “मानवाधिकारांशी संबंधित एक अजून बाजू आहे. सध्याच्या काळात मानवाधिकाराची व्याख्या काही लोक आपापल्या पद्धतीने करू लागले आहेत. एक प्रकारच्या घटनेत काही लोकांना मानवाधिकाराचं उल्लंघन दिसतं. पण तशाच दुसऱ्या घटनेत याच लोकांना मानवाधिकाराचं उल्लंघन दिसत नाही. या प्रकारची मानसिकता देखील मानवाधिकाराला मोठं धोकादायक आहे.”, असं मोदी म्हणाले आहेत.

मानवाधिकारांचं उल्लंघन तेव्हा होतं, जेव्हा..

“मानवाधिकाराचं उल्लंघन तेव्हा होतं, जेव्हा त्याला राजकीय दृष्टीने पाहिलं जातं. राजकीय चष्म्यातून पाहिलं जातं. राजकीय फायदा-तोट्याच्या दृष्टीने पाहिलं जातं. या प्रकारचं वर्तन लोकशाहीसाठी नुकसानकारक आहे. असंच सोयीनुसार वर्तन ठेवणारे लोक मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या नावावर देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून देशाला सावध राहायला हवं”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीकाकारांवर निशाणा साधला आहे.

महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाचा दिला दाखला!

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाचा देखील दाखला दिला. “महात्मा गांधींनी देशाला अहिंसेच्या तत्वावर आधारलेल्या चळवळीतून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यामुळे जगभरातले लोक बापूंकडे मानवाधिकार आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहतात”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“याआधी अनेकदा इतिहासात जेव्हा जग चुकीच्या दिशेने भरकटलं असताना देखील भारत मात्र मानवाधिकाराच्या मार्गाशी बांधील राहिला आहे. भारत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या तत्त्वाला अनुसरून पुढे जात राहणार आहे. या मार्गात सर्वांसाठी मानवाधिकार या मूलभूत तत्वासाठी देखील भारत काम करत राहणार आहे”, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.

Story img Loader