१ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ९० मिनिटांचं भाषण केलं. या भाषणात त्यांनी हिंदुत्व, महात्मा गांधी, संविधान असे सगळेच मुद्दे बाहेर काढले आणि आम्ही घाबरत नाही असं म्हटलं आहे. तसंच भाजपा, मोदी आणि संघा म्हणजे हिंदुत्व नाही असाही टोला राहुल गांधींनी लगावला. हिंदू हिंसक असतात या राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ झालेला पाहण्यास मिळाला आहे. आता या सगळ्यानंतर एनडीएच्या खासदारांना राहुल गांधींसारखं संसदेत वागू नका असा सल्ला दिला आहे.

राहुल गांधींंच्या भाषणाचं इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून कौतुक

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सर्वपक्षीय खासदारांनी भूमिका मांडली. या भाषणात भूमिका मांडत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि संघावर जोरदार टीका केली. या भाषणाचं इंडिया आघाडीचे नेते कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे भाजपा आणि एनडीएचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत.

केंद्रीय मंत्री किरण रिजेजू काय म्हणाले?

किरण रिजेजू माध्यमांना म्हणाले, “आज आम्हाला पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचा मंत्र दिला आहे. त्यांनी सांगितलं एनडीएचे जे खासदार निवडून आले आहेत त्यांनी आपण देशासाठी निवडून आलो आहोत हे विसरु नका म्हटलं आहे. तसंच एनडीएच्या प्रत्येक खासदाराने देशाला प्राधान्य देऊन काम करावं. तसंच प्रत्येक खासदाराने संसदेची जी नियमावली आहे त्या नियमावलीला धरुनच आपलं वर्तन ठेवावं.” असं आम्हाला सांगितल्याचं रिजेजू यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “राहुल गांधींचे भाषण म्हणजे स्टँडअप कॉमेडी…”, खासदार कंगना रणौत, रवि किशन यांची टीका

पंतप्रधान संग्रहालयाला भेट द्या, अशाही सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला या सूचनाही दिल्या आहेत की प्रत्येक खासदाराने त्यांच्या कुटुंबासह पंतप्रधान संग्रहालयाला भेट दिली पाहिजे. त्यामागे कुठलाही राजकीय अजेंडा मनात ठेवू नये. उलट आत्तापर्यंत ज्या पंतप्रधानांनी या देशासाठी योगदान दिलं आहे त्यांची माहिती कळण्यासाठी तुम्ही कुटुंबासह या संग्रहालयाला भेट द्या असं आम्हाला मोदींनी सांगितलं.

राहुल गांधींचं भाषण चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाला लक्ष्य करत राहुल गांधींनी संसदेत सोमवारी जे भाषण केलं त्या भाषणात हिंदू हिंसक असतात आणि भाजपा, मोदी आणि संघ म्हणजे हिंदू नाहीत असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. ज्यानंतर संपूर्ण हिंदू समुदायाला तुम्ही हिंसक म्हणू नका असं त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. मात्र राहुल गांधी तातडीने म्हणाले की तुम्ही म्हणजे हिंदू नाही तुम्ही सांगता ते हिंदुत्व नाही. आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या खासदारांना संसदेत नियमाने वागा राहुल गांधींसारखं वागू नका अशा सूचना दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधींनी लोकसभेत हिंदू समाजाचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी असं म्हटलं आहे.