प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधला. या चर्चेमध्ये महिला सशक्तीकरणापासून भारतातील तंत्रज्ञानविषयक प्रगतीचाही उल्लेख आला. यासंदर्भात बिल गेट्स यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरे दिली. यावेळी सध्या सगळीकडे चर्चा असणाऱ्या एआय तंत्रज्ञानाबाबत बिल गेट्स यांनी विचारणा केली असता नरेंद्र मोदींनी एआयचं महत्त्व आणि त्यांचा स्वत:चा एआय तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन याविषयी भाष्य केलं.
“आमच्याकडे मूल जन्मल्यावरही ए आई म्हणतं!”
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिश्किल टिप्पणी केली. “एआयचं महत्त्व खूप आहे. मी चेष्टेनं कधीकधी म्हणतो. आमच्या देशात मातेला अनेक राज्यांत आई म्हणतात. आमच्याकडे मूल जन्माला आल्यावर ते आईही म्हणतं आणि ए आईही म्हणतं”, असं मोदी म्हणाले.
एआयचा वापर लोकांच्या दैनंदिन जीवनात त्यांची मदत करण्यासाठी व्हायला हवा, असं मोदी यावेळी म्हणाले. “मी काशी-कमिल संगमम असा कार्यक्रम केला. काशीत तामिळनाडूमधले अनेक लोक आले होते. तिथे मी हिंदीतून बोललो. पण तिथल्या सर्व लोकांनी माझं भाषण एआयच्या माध्यमातून तमिळमध्ये ऐकलं”, अशी आठवण मोदींनी यावेळी सांगितली.
“आपण एआयशी वाद घालायला हवा”
दरम्यान, एआयचा वापर आपण कसा करायला हवा, याबाबत बोलताना मोदींनी एआय तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्याचा सल्ला दिल. “आपण एआयचा वापर एखाद्या जादूच्या कांडीसारखा केला तर फार अन्याय होईल. किंवा एआयचा वापर आपल्या आळशीपणाला झाकण्यासाठी केला तर तेही चुकीचं होईल. मला पत्र लिहायचं असेल आणि मी जर चॅट जीपीटीला सांगितलं की मला पत्र लिहून दे, तर ते चुकीचं आहे. आपण तर चॅटजीपीटीशी स्पर्धा करायला हवी. त्याच्याशी वाद घालायला हवा की तू अमुक गोष्ट व्यवस्थित करत नाही. तू याऐवजी अमुक गोष्ट का नाही सांगितली? आपण एआयच्याही पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवा”, असं मोदी म्हणाले.
‘मोदींचे २०४७ च्या विकसित भारताचे ध्येय मूर्खपणाचे’, रघुराम राजन यांची टीका
“मी रोज वेगवेगळी आव्हानं देत असतो”
“आमच्याकडे अनेक भाषा आहेत. मी एआयला सांगतो की या भाषा समजून घे. मी एकदा आमच्या अंतराळवीरांशी संवाद साधण्यासाठी गेलो होतो. तिथे अंतराळवीरांसाठीच्या रोबोटशी मी बोललो. मी वेगवेगळ्या आवाजात त्याच्याशी बोलत होतो. तो माझ्याशी तरीही व्यवस्थित बोलत होता. मी मग त्याचं नाव बदलून त्या रोबोटशी बोलायचा प्रयत्न केला. पण तेव्हा त्यानं प्रतिसाद दिला नाही. मी त्यांना म्हटलं त्याचं नाव घेतल्याशिवाय तो मला प्रतिसाद देत नाही. त्यानं माझा आवाज ओळखून माझ्याशी संवाद साधायला हवा. तेव्हा आमचे शास्त्रज्ञ म्हणाले ठीक आहे, आम्ही हे करून बघतो. मी प्रत्येक वेळी अशी नवनवीन आव्हानं देत असतो”, असंही मोदींनी बिल गेट्स यांना सांगितलं.