PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वयाची ७४ वर्षे पूर्ण केली असून ते ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचा वाढदिवस भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रमदेखील राबवले जात आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते विरोधीपक्षाच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवस कसा साजरा करणार?
पंतप्रधान मोदी आज ओडिशा दौऱ्यावर असून ते आज भुवनेश्वरमधील गडाकाना इथे २६ लाख पीएम आवास घरांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच ते सैनिक शाळेजवळील गडकाना झोपडपट्टी परिसरालाही भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी येथील नागरिकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज सुभद्रा योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेनंतर्गत दरवर्षी १ कोटी गरीब महिलांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन समान हप्त्यांमध्ये १० हजार रुपये दिले जाणार आहेत.
भाजपाकडून विविध उपक्रमांचे आयोजन
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच आज पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या ६०० हून अधिक भेटवस्तूंचा लिलावही करण्यात येणार आहे. लिलावासाठी ठेवल्या जाणाऱ्या या भेटवस्तूंची मूळ किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली आहे. या लिलावातून मिळणारा निधी राष्ट्रीय गंगा निधीला हस्तांतर करण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींसह एनडीएच्या नेत्यांकडून शुभेच्छा
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशाच्या राष्ट्रपतींसह भाजपाचे नेते, पदाधिकारी तसेच विरोधीपक्षाच्या नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी मोदी यांना देशाचे कर्णधार म्हणून संबोधलं आहे.
“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचा त्यांचा संकल्प पूर्ण होवो, अशी आमची इच्छा आहे. पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. २१वे शतक हे भारताचं शतक आहे, कारण देशाचे कर्णधार पंतप्रधान मोदी आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनीही सॅंड आर्टद्वारे पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महाप्रभूंचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. विकसित भारताची तुमची स्वप्ने साकार होवोत. पंतप्रधान मोदीजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” अशी पोस्ट त्यांनी एक्स या समाज माध्यमावर केली आहे.