पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त आज देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, देशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्तृतिक क्षेत्रासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोदी नुकतेच उझबेकिस्तानहून भारतात परतले आहेत. या दौऱ्यात त्यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली. यावेळी पुतीन यांनी “आमच्या परंपरेनुसार तुम्हाला आधी शुभेच्छा देऊ शकत नाही”, असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं टाळलं, मात्र त्याचवेळी भविष्यातील वाढचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काय म्हणाले पुतीन?
व्लादिमीर पुतीन यांनी मोदींच्या भेटीदरम्यान त्यांना शुभेच्छा देताना रशियाच्या एका पद्धतीचाही उल्लेख केला. “माझे प्रिय मित्र मोदी..उद्या तुमचा वाढदिवस आहे. पण रशियातील आमच्या प्रथेनुसार आम्ही प्रत्यक्ष वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा देत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता शुभेच्छा देऊ शकत नाही. पण तुमच्या वाढदिवसाबद्दल आम्हाला माहिती आहे याची तुम्ही नोंद घ्यावी असं आम्हाला वाटतं. पण आत्ता तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही आमचं मित्रराष्ट्र भारताला शुभेच्छा देतो. भारताची समृद्धी व्हावी अशी कामना करतो”, असं पुतीन यावेळी म्हणाले.
नेमकं काय घडलं मोदी-पुतीन चर्चेमध्ये? वाचा सविस्तर
“ही युद्धाची वेळ नव्हे”
दरम्यान, या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली. ‘‘ही युद्धाची वेळ नव्हे,’’ असा सल्ला मोदींनी पुतीन यांना दिला. ‘‘आपण युद्धाबाबत दूरध्वनीवरही चर्चा केली आहे. आता शांततेच्या मार्गाने तोडगा कसा काढता येईल, यावर चर्चा करण्याची संधी प्रत्यक्ष भेटीमुळे मिळाली,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर, ‘‘युद्धाबाबतची तुमची चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही,’’ असे पुतीन यांनी मोदींना सांगितले.