Shatrughan Sinha : मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या जातीवरून केलेल्या टीप्पणीनंतर आता देशातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नसल्याचे ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?
“अशा प्रकारे देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना जात विचारणं चुकीचं आहे. तुम्ही अशा प्रकारे देशातील सर्वात शक्तीशाली नेत्याला जात विचारू शकत नाही. अनुराग ठाकूर यांनी चुकीच्या पद्धतीने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे”, अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली.
“मोदी नजरेला नजरही भिडवू शकत नाही”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आता देशात पूर्वीसारखा कमजोर विपक्ष नाही. तसेच देशातील सरकारही पहिल्यासारखी मजबूत नाही. हे मोदी सरकारने लक्षात घ्यायला हवं. आज जेव्हा देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आव्हान देतात तेव्हा देशाचे पंतप्रधान त्यांच्या नजरेला नजरही भिडवू शकत नाही. त्यामुळे अनुराग ठाकूर यांनी ज्यापद्धतीने टीका केली आहे, हे असंच सुरु राहिलं, तर मोदी सरकारसमोर मोठी अडचण निर्माण होईल”, अशी टीकाही त्यांनी केली.
अनुराग ठाकूर नेमकं काय म्हणाले?
लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेला मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. यावेळी अनुराग ठाकूर यांनी आतापर्यंतचे काँग्रेसचे पंतप्रधान आणि त्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचली. त्यानंतर आता मला सांगा हलवा कोणाला मिळाला? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधी यांना विचारला होता. पुढे बोलताना, काही लोक ओबीसींबद्दल केवळ बोलत असतात. मात्र यांच्यासाठी (काँग्रेस) ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन आहे. त्याचबरोबर ज्यांची जात कोणाला माहिती नाही, तो जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करतायत. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र उत्तर द्यायला कोण उभं राहिलं ते सर्वांनी पाहिलं आहे.” असं अनुराग ठाकूर म्हणाले होते.