Arvind Kejriwal CM residence Controversy: दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कॅगचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर राजधानीमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. द इंडियन एक्सप्रेसने दैनिकाने कॅगच्या हवाल्याने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नुतनीकरणावर केलेल्या खर्चाचा तपशील दिला आहे. आता या बातमीचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्ष आणि पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. या निवासस्थानावर केलेला खर्च हा ‘आप’च्या भ्रष्टाचाराचा नमुना असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी एका जाहीर सभेत म्हटले.
दिल्लीत भाजपाच्या परिवर्तन मेळाव्यात बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज एका मोठ्या वृत्तपत्रात अरविंद केजरीवाल यांच्या शीश महालवर झालेल्या खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. कॅगच्या अहवालात नमूद केलेल्या आकडेवारीवर ही बातमी आहे. करोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण देश झगडत होता. तेव्हा आम आदमी पक्ष शीश महाल बांधण्यात व्यस्त होता.
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच ‘कॅग’च्या अहवालावर आधारित द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणावर झालेल्या खर्चाचा तपशील दिला आहे. नुतनीकरणासाठी सुरुवातीला ७.९१ कोटींचा खर्चाचा प्रस्ताव दिला गेला. मात्र नंतर हा खर्च वाढून २०२० मध्ये तब्बल ८.६२ कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र २०२२ रोजी जेव्हा नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले तेव्हा त्याची एकूण किंमत ३३.६६ कोटींवर गेली होती.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “दिल्लीवर ‘आप’दा आणणारे हे लोक केंद्रावर खोटा आरोप करतात की, केंद्र सरकार आम्हाला काम करू देत नाही. केंद्र सरकार पैसे देत नाही. पण हे लोक किती खोटारडे आहेत, याचे उदाहरण यांचा शीश महाल पाहून कळते. आजच एका मोठ्या वृत्तपत्राने शीश महालावर झालेल्या खर्चाचा तपशील दिला आहे. करोना काळात दिल्लीतील लोक औषध आणि ऑक्सिजनासाठी झगडत होते, तेव्हा हे लोक आपला शीश महाल बनविण्यात दंग होते.”
कॅगच्या अहवालात नेमकं काय?
- मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानाचे दरवाजे आणि खिडक्यांना पडदे लावण्यासाठी तब्बल ९६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर किचनमधील उपकरणांसाठी ३९ लाख रुपये खर्च करण्यात आले.
- टीव्ही कन्सोलसाठी २० लाख ३४ हजार रुपये आणि जिम उपकरणासाठी १८ लाख ५२ हजार रुपये तर कार्पेट बसविण्यासाठी २० लाख ३४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.
- याशिवाय मिनी बारसाठी ४ लाख ८० हजार रुपये. भिंतींवर मार्बल बसविण्यासाठी २० लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु, अंतिम खर्च ६६ लाख ८९ हजार रुपयांवर गेला.
- मजल्यावर टाइल बसविण्यासाठी ५ लाख ५० हजार रुपये प्रस्तावित होते. परंतु, हा खर्च जवळपास १४ लाखांपर्यंत गेला आहे.
- नूतनीकरणाच्या दरम्यान, बांधकाम क्षेत्र ३६ टक्के (१,३९७ चौ. मी. पासून १,९०५ चौ. मी. पर्यंत) वाढले आहे. या सर्व गोष्टी नूतनीकरण खर्च वाढण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.