महिला आरक्षणाचं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा मागील तीन दशकांपासून असा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. तसेच आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचंही नमूद केलं. ते शुक्रवारी (२२ सप्टेंबर) दिल्लीतील भाजपा मुख्यालयात आयोजित नारी शक्ती वंदन अभिनंदन कार्यक्रमात बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, “लोकशाहीत महिलांच्या सहभागासाठी कायदा व्हावा यासाठी भाजपा तीन दशकांपासून प्रयत्न करत होती. हे आमचं आश्वासन होतं आणि आम्ही ते पूर्ण करून दाखवलं आहे. भारताला विकसित बनवण्यासाठी आज भारत महिलांना मोकळं आकाश देत आहे. आज देश आई-बहिण आणि मुलींच्या समोर येणारा प्रत्येक अडथळा दूर करत आहे.”
“आम्ही माता-भगिणींशी संबंधित प्रत्येक बंधनं तोडण्याचा प्रयत्न केला”
“मागील ९ वर्षांमध्ये आम्ही माता-भगिणींशी संबंधित प्रत्येक बंधनं तोडण्याचा प्रयत्न केला. आमच्या सरकारने एकामागून एक अशा योजना आणि कार्यक्रम राबवले ज्यामुळे आमच्या बहिणींना सन्मानपूर्ण, सुविधापूर्ण, सुरक्षित आणि समृद्ध जीवन मिळालं,” असं मत नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
“पूर्ण बहुमत असलेलं सरकार असेल तर देश मोठे निर्णय घेतो”
“‘नारी शक्ति वंदन विधेयक’ संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर होणं याचा पुरावा आहे की, पूर्ण बहुमत असलेलं सरकार असेल तर देश मोठे निर्णय घेतो आणि मोठे टप्पे पार करतो. पूर्ण बहुमताचं सरकार असल्यामुळेच ‘नारी शक्ति वंदन विधेयक’ वास्तवात आलं आहे. या कायद्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, देश पुढे जाण्यासाठी पूर्ण बहुमत असलेलं मजबूत आणि निर्णयक्षम सरकार अत्यावश्यक आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.