Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. तसंच आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात त्यांनी अमेरिकेत आत्तापासून सुवर्ण युग सुरु झालं आहे असं जाहीर केलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख त्यांनी केला. मी त्या हल्ल्यातून वाचलो कारण मला अमेरिकेला पुढे घेऊन जायचं आहे असंही ट्रम्प म्हणाले. जगभरातून ट्रम्प यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट?
“माझे प्रिय मित्र आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदी तुम्ही विराजमान झाला आहात. या ऐतिहासिक दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. आपल्या दोघांच्या देशांसाठी प्रगती आणि विकासाच्या संधी तसंच भविष्याला आकार देण्यासाठीच्या दृष्टीने तुमच्यासह काम करु इच्छितो, त्यासाठी मी उत्सुक आहे. तुमच्या यशस्वी कारकिर्दीसाठी तुम्हाला शुभेच्छा ” या आशयाची पोस्ट लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिेकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल ट्रम्प यांचं अभिनंदन. मला विश्वास आहे की येत्या वर्षांमध्ये आपले संबंध हे आणखी चांगले आणि तेवढेच एकोप्याचे होतील.
अमेरिकेत ट्रम्प पर्व
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरु झालं आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.
अमेरिकन संसदेत पार पडला शपथविधी सोहळा
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता शपथ घेतली. अनेक दशकांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची शपथ ही अमेरिकेच्या संसदेत पार पडली. कारण अमेरिकेत कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे अमेरिकेन संसदेत या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
अमेरिकेत आता सुवर्णयुग सुरु झालं आहे-डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच पहिल्या दिवशी २०० पेक्षा जास्त महत्वाच्या निर्णयांवर ते स्वाक्षरी करणार आहेत. ज्यामध्ये सीमा सुरक्षा, ऊर्जा यासह राष्ट्रीय सीमा आणीबाणी संदर्भातील निर्णयांचा समावेश आहे. याबरोबरच यूएस आर्मी आणि होमलँड सिक्युरिटीला दक्षिण सीमेचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने महत्वाचे निर्देश दिले जातील. अमेरिकेत आता सुवर्ण युग सुरु झालं आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.