देशभरात करोनाची दुसरी लाट शेवटाकडे येत असतानाच तिसऱ्या लाटेचं संकट समोर उभं ठाकलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न, नियोजन करण्यात देशभरातील आरोग्य यंत्रणा गुंतल्या असताना दुसरीकडे व्यापक प्रमाणावर लसीकरणाला देखील सुरूवात करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला आहे. राष्ट्रीय पातळीवर देखील हा वेग वाढलेला दिसून येईल. त्यातच देशभरात दोन राज्यांनी आणि एका केंद्र शासित प्रदेशाने आपल्या सर्व पात्र नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याची कामगिरी साध्य केली आहे. त्यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल या राज्यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच, या राज्यांच्या कामगिरीबाबत आपल्याला अभिमान वाटत असल्याचं देखील पंतप्रधानांनी नमूद केलं.

हिमाचल प्रदेश ठरलं देशातलं पहिलं राज्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिमाचल प्रदेशमधील आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या कामगिरीचं कौतुक केलं. आपल्या राज्यातील १०० टक्के पात्र नागरिकांना करोना लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश पहिलं राज्य ठरलं आहे. “हिमाचल प्रदेशनं मला गर्व वाटावा अशी संधी दिली आहे. अगदी मूलभूत गोष्टींसाठी देखील संघर्ष करताना मी या राज्याला पाहिलं आहे. पण आज त्यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. मला या राज्यातील सरकार आणि आरोग्य पथकांचं अभिनंदन देखील करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद देखील म्हणायचं आहे”, असं पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलले.

 

हिमाचल प्रदेशमध्ये एकीकडे १०० टक्के पात्र नागरिकांना पहिला डोस दिला गेला असताना दुसरीकडे राज्याच्या एक तृतीयांश पात्र जनतेला दुसरा डोस देखील देऊन झाला आहे. याचा अर्थ राज्याची जवळपास ६५ टक्के जनता आता पूर्ण लसीकृत झाली आहे.

 

हिमाचल प्रदेशपाठोपाठ सिक्कीमनं देखील राज्यातील १०० टक्के पात्र नागरिकांन लसीाच पहिला डोस दिला आहे. त्याशिवाय दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये देखील सर्व पात्र नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. लवकरच यामध्ये अजून काही राज्यांची भर पडणार असल्याची माहिती देखील यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.