२३ ऑगस्ट रोजी चंद्रावर भारताचं चांद्रयान उतरलं आणि अवघ्या देशानं एकच जल्लोष केला. यावेळी इस्रोच्या वैज्ञानिकांचं देशभरातून कौतुक होत होतं. त्याचवेळी भारतावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत होता. त्यावेळी विदेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि कौतुक ऑनलाईन केलं. आज विदेश दौऱ्यावरून परत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूला इस्रोच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी दाखल झाले. यावेळी इस्रोच्या वैज्ञानिकांसमोर बोलताना मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले नरेंद्र मोदी इस्रोमध्ये?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोमध्ये बोलताना सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. तसेच, असे प्रसंग फार दुर्मिळ असतात, असंही मोदी म्हणाले. “तुम्हा सर्वांमध्ये येऊन आज मला वेगळाच आनंद होत आहे. असा आनंद फार दुर्मिळ प्रसंगी मिळतो”, असं मोदी यावेळी म्हणाले.
“इच्छा माझी, अडचण तुमची”
दरम्यान, यावेळी मोदींनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर समोरच्या वैज्ञानिकांमध्ये हास्याची लकेर उमटली. आज भल्या सकाळीच आपण इस्रोमध्ये वैज्ञानिकांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्यामुळे तिथल्या सर्वांची अडचण झाली असावी, असं मोदी म्हणाले. “कधीकधी वाटतं की मी तुमच्यावर अन्याय करतोय. इच्छा माझी आणि संकट तुमच्यावर. सकाळी-सकाळी तुम्हा सर्वांना इथे या वेळी यावं लागलं. पण माझी फार इच्छा होती की तुम्हाला भेटून आभिनंदन करावं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी नमूद केलं.
बोलताना मोदींना भावना अनावर…
दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. “तुमची अडचण झाली असेल. पण मला भारतात येताच लवकरात लवकर तुमच्या दर्शनासाठी यायचं होतं”, असं म्हणताना मोदींचा कंठ दाटून आला. “तुम्हाला सर्वांना सॅल्यूट करायचा होता.तुमच्या श्रमांना सॅल्युट आहे. तुमच्या धैर्याला सॅल्युट आहे. तुमच्या निष्ठेला सॅल्युट आहे.. तुमच्या हिंमतीला सॅल्युट आहे”, असं मोदी म्हणाले.
“तुम्ही देशाला ज्या उंचीवर घेऊन गेला आहात, हे कुठलं साधं यश नाहीये. अंतराळात भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा हा शंखनाद आहे. भारत चंद्रावर पोहोचला आहे. जिथे आत्तापर्यंत कुणीही पोहोचू शकलं नव्हतं, तिथे आपण पोहोचलो आहोत. आपण ते केलं जे आधी कुणी कधी केलं नव्हतं. २१व्या शतकात हाच भारत जगाच्या मोठमोठ्या समस्यांचं निराकरण करेल”, असा विश्वास नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला.
चांद्रयान ३ लँडिंग झालेल्या जागेचं नामकरण, आता ‘या’ नावाने ओळखला जाणार दक्षिण धुव्र; मोदींची घोषणा
“माझ्या डोळ्यांसमोर २३ ऑगस्टचा दिवस, तो प्रत्येक क्षण वारंवार तरळून जातोय. जेव्हा यान चंद्रावर उतरलं, तेव्हा ज्या पद्धतीने इस्रो केंद्रात, संपूर्ण देशात लोकांनी जल्लोष केला, तो क्षण कोण विसरू शकेल? काही क्षण अमर होऊन जातात. तो क्षण अमर होऊन गेला. प्रत्येक भारतीयाला वाटत होतं की विजय त्याचा स्वत:चा झाला आहे. प्रत्येक भारतीयाला वाटत होतं की तो स्वत: एका मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. हे सगळं तुम्ही सर्वांनी शक्य केलं आहे”, असं म्हणताना मोदींनी उपस्थित सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं.