PM Modi Convinced Vladimir Putin on Nuclear War: ‘जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे’ आणि ‘तिसरं महायुद्ध हे अण्वस्त्रयुद्ध असेल’ ही दोन विधानं सातत्याने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संदर्भात वाचनात किंवा ऐकण्यात येतात. अण्वस्त्रयुद्धाची फक्त भीती असून ते कधीच होणार नाही असेही दावे केले जातात. पण प्रत्यक्षात सध्या चालू असलेल्या रशिया विरुद्ध युक्रेन युद्धामध्ये अण्वस्त्राचा वापर होणार होता, असा दावा करण्यात आला आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अण्वस्त्राचा वापर झाला नाही, असाही दावा करण्यात आला आहे.
कुणी केलाय हा दावा?
पोलंडच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री व्लॅदीस्लॉ तिओफिल बार्टोसझेवस्की यांनी यासंदर्भात सीएनएन न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनविरोधात अण्वस्त्र वापरण्यापासून परावृत्त केलं, असा दावा त्यांनी केल्याचं मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
“वॉर्सोमध्ये आमची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अतिशय चांगली चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनविरोधात अण्वस्त्र न वापरण्याबाबत तयार केलं. आम्हाला कायमस्वरूपी टिकणारी शांती हवी आहे. आम्हाला युक्रेनमध्ये स्थिर आणि शाश्वत शांती हवी आहे”, असं बार्टोसझेवस्की म्हणाले. बार्टोसझेवस्की यांच्या या मुलाखतीनंतर मोदींची लेक्स फ्रिडमन यांच्या पॉडकास्टवर मुलाखत झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची युक्रेनबाबत भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन युद्धाबाबत या मुलाखतीमध्ये सविस्तर भूमिका मांडली. “माझे रशिया आणि युक्रेनशी सारखेच जवळचे संबंध आहेत. मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशेजारी बसून त्यांना सांगू शकतो की ही युद्धासाठी योग्य वेळ नाही. त्याचबरोबर मी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनाही मैत्रीखातर सांगू शकतो की ब्रदर, तुमच्यामागे जगभरात कितीही लोक असले, तरीही या मुद्द्यावर युद्धभूमीत तोडगा निघू शकत नाही”, असं मोदी या मुलाखतीत म्हणाले होते.
“जेव्हा युक्रेन आणि रशिया ही दोन्ही राष्ट्रे चर्चेसाठी एकत्र येतील, तेव्हाच यावर तोडगा निघू शकेल. युक्रेन त्यांच्या मित्रराष्ट्रांशी अगणित चर्चेच्या फेऱ्या करू शकतं, पण त्यातून काहीही साध्य होणार नाही. या चर्चेमध्ये दोन्ही पक्ष असायला हवेत. सुरुवातीला या मुद्द्यावर शांती प्रस्थापित करणं आव्हानात्मक होतं. पण आता सध्याच्या परिस्थितीत रशिया व युक्रेन यांच्यात अर्थपूर्ण चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे”, असंही मोदींनी नमूद केलं.