आसाममध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये प्रचार करत असून आज आसामच्या कामरूपमध्ये त्यांनी प्रचारसभा घेतली. या सभेमध्ये मोदी सरकारवर त्यांनी चौफेर टीका केली. “तुम्हाला जर खोटं ऐकायचं असेल, तर आपला टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते दिवसाचे २४ तास खोटं बोलतात”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी सीएएच्या मुद्द्यावरून देखील भाजपावर टीकास्त्र सोडलं.
“माझं नाव नरेंद्र मोदी नाही”
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “मी इथे तुमच्याशी खोटं बोलायला आलेलो नाही. कारण माझं नाव नरेंद्र मोदी नाही. आसामविषयी, शेतकऱ्यांविषयी किंवा इतर कोणत्याही गोष्टीविषयी तुम्हाला जर खोटं ऐकायचं असेल, तर तुम्ही टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा. ते पूर्ण २४ तास खोटं बोलतात”. “भाजपा रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही. युवकांना मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. उलट आसामवर आक्रमण करते. सीएए हा कायदा आसामवरचं आक्रमणच आहे”, असं देखील राहुल गांधी म्हणाले.
I’ve not come here to lie to you. My name isn’t Narendra Modi. If you want to listen to lies – about Assam, farmers, about anything – then switch on your TV, look at Narendra Modi’s face & listen to him as much as you want. He lies to India all 24 hours: Rahul Gandhi in Kamrup pic.twitter.com/PCNxIRlDox
— ANI (@ANI) March 31, 2021
“…म्हणून आमचा सीएएला विरोध”
सीएएच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले, “हा फक्त एक कायदा नाही. हा तुमचा इतिहास, भाषा आणि बंधुत्वावर हल्ला आहे. त्यामुळेच आम्ही त्याला विरोध करत आहोत”, असं राहुल गांधी म्हणाले.
एकीकडे राहुल गांधींनी सीएएच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला असतानाच दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सुनावलं आहे.
“गांधी भाऊ बहीण फिरायला आलेत”
“काँग्रेस पक्षाचे हे दोन नेते भाऊ-बहीण आसाममध्ये पर्यटनाला येतात. राहुलबाबांना पाहिलं की नाही? अजून चहाच्या मळ्यांमध्ये पानं नाही आली, तेवढ्या प्रियांका गांधी पानं तोडतानाचं फोटोसेशन करत आहेत. प्रियांका गांधी आधी फोटो काढून घेतील. नंतर चहा मळेवाल्यांचं जे व्हायचं ते होवो”, असं देखील अमित शाह म्हणाले.
“घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही”
अमित शाह म्हणाले, “काल बद्रुद्दीन अजमल म्हणाले की सरकारची चावी माझ्या हातात आहे. पण सरकारची चावी तुमच्या हातात नसून आसामच्या जनतेच्या हातात आहे. आसामला आम्ही घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही. तुम्हाला मुळापासून उखडून टाकण्याचं काम भाजपा करेल.”