Delhi Railway Station Stampede: प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली स्थानकावरून दोन विशेष रेल्वे सोडण्यात येतात. या रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी शनिवारी (१५ फेब्रुवारी) एकच गर्दी उसळली ज्यात १८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्सवर पोस्ट टाकत मृतांना श्रद्धांजली दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या कुटुंबियातील प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या सर्वांना यंत्रणांकडून योग्य ती मदत दिली जाईल.

सदर दुर्घटनेनंतर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रेल्वे स्थानकावर अवघ्या काही मिनिटांत अभूतपूर्व अशी गर्दी उसळल्याचे दिसत आहे. शनिवार, रविवार असल्यामुळे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेनंतर दुःख व्यक्त केले. एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर घडलेली घटना भीषण होती. चेंगराचेंगरीच्या घटनेमुळी झालेल्या जीवितहानीमुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव काल रात्रीपासून या घटनेवर लक्ष ठेवून होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलीस आणि रेल्वे पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. तसेच गर्दी कमी करण्यासाठी तात्काळ चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन केल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या घटनेनंतर शोक व्यक्त केला. तसेच या घटनेमुळे रेल्वे आणि सरकारचा नाकर्तेपणा आणि असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रयागराजला भाविक मोठ्या संख्येने जाणार हे माहीत असताना स्थानकावर आणखी चांगला बंदोबस्त असणे आवश्यक होते. कुणाच्यातरी बेजबाबदार वृत्तीमुळे निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागणार नाहीत, याची काळजी सरकार आणि प्रशासनाने घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

Story img Loader