रोजगार मेळाव्यादरम्यान देशातील तरुणांना नियुक्तीपत्रके देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे. “पूर्वी मीटरचा हिशोब असायचा, आता किलोमीटरचा असतो”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख सरकारी नोकऱ्यांचं आवाहन केलं आहे. यासाठी आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोजगार मेळाव्यातून जवळपास ७१ हजार तरुणांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्रे आज देण्यात आली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी मीटर-किलोमीटरचा हिशोब मांडला, तसंच यापुढे अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचे सांगत तरुणांना आश्वासित केले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.

…आता किलोमीटर हिशोब

“एखाद्या गावात रस्ता जातो तेव्हा काय परिणाम होतो, याचा तुम्ही अंदाज लावू शकता. यामुळे संपूर्ण इको-सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. २०१४ मध्ये देशात ७० पेक्षा कमी जिल्ह्यांतील गावात गॅस नेटवर्कचा विस्तार झाला होता. आता हीच संख्या ६३० पेक्षाही अधिक झाली आहे. २०१४ पर्यंत ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी ४ लाख किमीपेक्षाही कमी होती. आता ७ लाख किमीपेक्षाही जास्त रस्त्यांची लांबी झाली आहे. २०१४ च्या आधी एका महिन्यांत फक्त ६०० मीटरपर्यंतच नव्या मेट्रो लाइन बनवल्या जात होत्या. परंतु, आम्ही प्रत्येक महिन्यात जवळपास ६ किमीच्या नवे मेट्रो लाईन्स बनवत आहोत. पूर्वी हिशोब मीटरचा असायचा, आता किलोमीटरचा असतो. पायाभूत सुविधांचा कोणताही प्रकल्प रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करत असतो”, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> Karanataka Election 2023 : कर्नाटक भाजपात चाललंय काय? दुसऱ्या यादीत माजी मुख्यमंत्र्यांसह सात आमदारांना डावललं!

देशातील आरोग्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत. २०१४ मध्ये भारतात ४०० हून कमी मेडिकल कॉलेज होते. आता भारतात ६६० मेडिकल कॉलेज आहेत. तसंच, पूर्वीपेक्षाही दुप्पट डॉक्टरांची संख्या आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तरुणांना आश्वासन

“विकसित भारतात संकल्पातून सिद्धी मिळवण्याकरता आमचं सरकार तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जांना संधी देण्यास कटिबद्ध आहे. आजचा नवा भारत ज्या नव्या नीती आणि रणनीतीवरून चालत आहे, त्यामुळे देशात नव्या संधी निर्माण होणार आहेत,” असं म्हणत मोदींनी पुढे देशातील तरुणांना आश्वस्त केलं.

“जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक भारताची अर्थव्यवस्था आहे. कोविडमुळे संपूर्ण जग आज मंदीच्या सावटाखाली आहे. अनेक देशातील अर्थव्यवस्था कोसळत आहे. असं असताना संपूर्ण जग भारताकडे ब्राईट स्पॉट म्हणून पाहात आहे. एका अहवालानुसार, भारतात स्टार्टअप्सने ४० लाखांपेक्षाही अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. ड्रोन सेक्टरमध्येही अशाचप्रकारे प्रगती झाली आहे. गेल्या ८ ते ९ वर्षांत क्रीडा क्षेत्रातही चांगले बदल झाले आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi distributed 71 thouands appointment letters in rojgar mela sgk
Show comments