वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तंत्रज्ञान आणि नवउपक्रमांच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिकेदरम्यान सहकार्य करण्यास प्रचंड वाव आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. यासंबंधी आपली अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याबरोबर चर्चा झाली असल्याचे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांच्या नियोजित भारत दौऱ्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्यात हे संभाषण झाले आहे. त्याशिवाय दोन्ही देशांबरोबर द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटीदेखील सुरू आहेत. त्यामुळे मोदी-मस्क चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ‘‘मी इलॉन मस्क यांच्याशी बोललो आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये झालेल्या आमच्या भेटीदरम्यान ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती त्याविषयीदेखील आम्ही बोललो. तंत्रज्ञान आणि नवउपक्रम या क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यास भरपूर वाव आहे. या क्षेत्रांमध्ये अमेरिकेबरोबर भागीदारी वाढवण्यास भारत कटिबद्ध आहे.’’

पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असता त्यांची मस्क यांच्याबरोबरही भेट झाली होती. त्या भेटीनंतर, आम्ही अवकाश, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि नवउपक्रम याविषयी बोललो असे मोदी यांनी सांगितले होते. तसेच आपण किमान सरकार, कमाल शासन हा अनुभवनही मस्क यांना सांगितल्याचे ते म्हणाले होते. त्या भेटीसाठी मस्क आपले कुटुंब आणि मुलांना बरोबर घेऊन आले होते.

मस्क यांना भारतीय बाजारपेठेत रस

इलॉन मस्क हे भारतामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. ते गेल्या वर्षी, लोकसभा निवडणुकांपूर्वीच भारतात येणार होते. मात्र, त्यावेळी त्यांचा तो दौरा पुढे ढकलला गेला होता. भारतातील कार उत्पादनासाठी ते दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची अपेक्षा होती. भारतामध्ये विजेवर चालणाऱ्या कारची विक्री हळूहळू पण निश्चित गतीने वाढत आहे. अलिकडेच भारत सरकारने विजेवर चालणाऱ्या कारच्या आयातशुल्कामध्ये १५ टक्के कपात केली आहे, त्याचा सर्वाधिक फायदा मस्क यांना होणे अपेक्षित आहे.