नवी दिल्ली : ‘‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या नागरिकांनी राज्यघटना आणि लोकशाही प्रक्रियेवर अढळ विश्वास ठेवून मतदान केल्याने जनतेचे अभिनंदन करतो. लोकसभा निवडणुकीत ६५ कोटींहून अधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला’’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या ‘मन की बात’मध्ये सांगितले.

आपल्या ३० मिनिटांच्या नभोवाणी संबोधनात पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांनी जनतेचे आभार मानले आणि निवडणूक आयोग व प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन केले. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय क्रीडापटूंना पंतप्रधानांनी पाठिंबा दिला. या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘चीअर४भारत’ हॅशटॅग वापरण्याचे आवाहन जनतेला केले.

हेही वाचा >>> उमा भारतींचं परखड मत, “प्रत्येक रामभक्ताचं मत भाजपाला मिळेल हा अहंकार..”

टोकियो येथील मागील ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीने प्रत्येक नागरिकाची मने जिंकली होती. यंदाही ते यश मिळवतील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. आमच्या खेळाडूंनी बुद्धिबळ आणि बॅडमिंटनमध्येही गौरवशाली कामगिरी केली आहे. आता आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्येही चांगली कामगिरी करून या खेळांमध्ये पदके जिंकून देशवासीयांची मने जिंकावीत, अशी आशा संपूर्ण देशाला आहे. येत्या काही दिवसांत मला भारतीय संघालाही भेटण्याची संधी मिळणार आहे. मी त्यांना तुमच्या वतीने प्रोत्साहन देईन, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की…

● जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ नावाच्या वनीकरण उपक्रमाची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण एक वृक्षारोपणही केल्याचे नमूद केले.

● केरळमधील अट्टप्पडी येथील आदिवासी महिलांनी बनवलेल्या कर्थुंबी छत्र्यांबाबत पंतप्रधानांनी सांगितले. ‘कर्थुंबी छत्र्यांनी केरळमधील एका छोट्या गावातून बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. स्थानिक लोकांच्या नवनिर्मितीचे यापेक्षा चांगले उदाहरण काय असू शकते,’ असे मोदी म्हणाले.

● ऑल इंडिया रेडिओच्या संस्कृत बुलेटिनला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले. प्राचीन भाषेने भारतीय ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रगतीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले.