संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे. या विजयासह गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, गुजरातमधील या विजयासंदर्भात प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहे. तेच हा अभूतपूर्व निकाला बघून मी भारावून गेलो असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर मी भारावून गेलो आहे. गुजरातमधील जनतेने विकासाचे राजकारण करणाऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. किंबहून हे विकासाचे राजकारण सुरू राहावे, अशी इच्छा जनतेची इच्छा आहे. मी या विजयानंतर गुजरातच्या जनतेचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहे. “मला गुजरातमधील सर्व मेहनती कार्यकर्त्यांना तुम्ही चॅम्पियन आहात असं सांगायचं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य नव्हता. हे कार्यकर्ताच पक्षाची खरी ताकद आहे,” असं ट्वीटही त्यांनी केले आहे.
याचबरोबर त्यांनी हिमाचल प्रदेशमधील जनतेचेही आभार मानले आहेत. “हिमाचल प्रदेशातील जनतेने भाजपाला दिलेल्या समर्थनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही कार्यरत राहू”, असं ते म्हणाले.