PM Modi First Reaction on Parliament Security Breach : संसदेवर १३ डिसेंबर २००१ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २२ वर्ष पूर्ण होत असताना त्याच दिवशी संसदेत काही तरूणांनी घुसखोरी करून गोंधळ निर्माण केला. याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. सरकारकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहून निवेदन दिलेले आहे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत भाष्य केले आहे. दैनिक जागरण या हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. तसेच या विषयावर वाद-प्रतिवाद करण्यापेक्षा याच्या खोलात जाण्याची गरज आहे, असेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी घुसखोरीवर काय म्हणाले?
दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “संसदेत जी घटना घडली, त्याच्या गंभीरतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकसभेचे अध्यक्ष यावर लक्ष ठेवून आहेत, तसेच त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या आहेत. तपास यंत्रणाही अतिशय कसून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घुसखोरीच्यापाठी कोण आहे? त्यांचा उद्देश काय आहे? हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाच्या खोलात जावे लागणार आहे. तसेच यावर समाधान काय आहे, याचाही शोध घेतला पाहीजे. शक्यतो अशा प्रकरणात वाद-प्रतिवाद टाळले पाहीजेत.”
हे वाचा >> संसदेत घुसखोरी केलेल्या तरुणांना आत्मदहन करायचे होते; दिल्ली पोलिसांनी कोणती नवी माहिती दिली?
संसदेतील घुसखोरी प्रकरणी आरोपींवर UAPA
१३ डिसेंबर रोजी लोकसभा सभागृह आणि संसदेच्या आवारात घुसखोरी करून धुराच्या नळकांड्या फोडणे आणि घोषणाबाजी करण्याच्या आरोपाखाली आतापर्यंत सहा आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सागर शर्मा आणि डी. मनोरंजन यांनी लोकसभा सभागृहात उडी मारली होती. तर नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांनी संसदेच्या आवारात धुराच्या नळकांड्या फोडून घोषणाबाजी केली होती. या चारही आरोपींना बाहेरून ललित झा आणि महेश कुमावत यांनी मदत केली होती.
चार आरोपींना संसदेतूनच ताब्यात घेण्यात आले होते. तर मुख्य आरोपी ललित झा याने दुसऱ्या दिवशी दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तर काल (१६ डिसेंबर) महेश कुमावत या सहाव्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. सर्व सहा आरोपींवर युएपीए कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेत हलगर्जी केल्याप्रकरणी संसदेतील आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
हे वाचा >> “… म्हणून तरुणांनी संसदेत घुसखोरी केली”, राहुल गांधी यांनी सांगितले कारण
ब्रह्माडांची कोणतीही शक्ती आता कलम ३७० पून्हा आणणार नाही
ब्रह्मांडाची कोणतीही शक्ती आता ३७० आणू शकत नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीमध्ये म्हटले. पाच राज्यांपैकी तीन राज्यात मोठा विजय प्राप्त केल्यानंतर मोदींनी विरोधकांना सकारात्मक राजकारण करण्याचा सल्ला दिला. तसेच २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. हा दिवस माझ्यासाठी खास असणार आहे, असेही मोदी या मुलाखतीत म्हणाले. हा आनंद केवळ माझा नाही, तर भारतातील १४० कोटी जनतेचा हा आनंद आहे. माझ्यासाठी हा दिवस म्हणजे ‘हर घर अयोध्या, हर घर राम’ यासमान आहे, असेही ते म्हणाले.