कर्नाटकमधील प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल व्हिडीओ प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाची पंचाईत झाली आहे. याच प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान मोदी कर्नाटकमध्ये प्रचारसभा घेतली होती. भाजपाच्या मित्रपक्षातील उमेदवारावरच इतका गंभीर आरोप झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच टाईम्सनाऊला मुलाखत दिली. यादरमयान विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना प्रज्वल रेवण्णा प्रकरणाविषयी विचारण्यात आलं असता, प्रज्वल रेवण्णा सारख्या लोकांविरोधात Zero Tolerance चे धोरण अवलंबले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी हे व्हिडीओ बाहेर येण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
प्रज्वल रेवण्णा सारख्या लोकांविरोधात Zero Tolerance चे धोरण अवलंबून त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी हे व्हिडिओ बाहेर येण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे व्हिडीओ एका दिवसात रेकॉर्ड केले गेले नाहीत. हे व्हिडीओ रेकॉर्ड झाले, तेव्हा जेडीएसची काँग्रेसबरोबर युती होती. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर हे व्हिडीओ जाणीवपूर्वक बाहेर आणले गेले, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली. प्रज्वल रेवण्णा देशाबाहेर गेल्यानंतर त्याचे व्हिडीओ प्रसारित करण्यात आले. त्यापूर्वी त्याला कर्नाटक सोडून जाण्याची परवानगी देण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकार संशायस्पद आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.
हेही वाचा – प्रज्वल रेवण्णांना ब्लू कॉर्नर नोटीस; रेड, पर्पल, यलो अशा सात प्रकारच्या नोटिसांचे अर्थ काय आहेत?
प्रज्वल रेवण्णा प्रकरण नेमकं काय?
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू व संयुक्त जनता दलाचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा याच्या कथिक सेक्स स्कँडल व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि खळबळ उडाली. एक-दोन नव्हे, तर जवळपास २९०० व्हिडीओ क्लिप्स असल्याचं तपासात समोर आलं आहे. एका पेन ड्राईव्हमध्ये या क्लिप्स असून खुद्द प्रज्वल रेवण्णा याच्या ड्रायव्हरनंच या सगळ्या क्लिप संबंधित तक्रारदाराला दिल्याचंही स्पष्ट झालं आहे. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.