पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा दाखवला. ही एक्स्प्रेस भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन आहे. “ही ट्रेन विमानाच्या तुलनेत १०० पट कमी आवाज करते. या ट्रेनचा अनुभव घेतल्यानंतर ज्यांना विमानाने प्रवास करायची सवय आहे ते लोक या ट्रेनला प्राध्यान्य देतील”, असा दावा या ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्यात अहमदाबादेत पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. गांधीनगर ते अहमदाबाद प्रवास करत मोदींनी प्रवासाचा आनंदही लुटला.
गांधीनगर आणि अहमदाबाद या जुळ्या शहरांचा विकास एक उत्तम उदाहरण आहे. याच मॉडेलप्रमाणे गुजरातमधील जुळ्या शहरांचा विकास केला जात आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. आत्तापर्यंत लोक न्यूयॉर्क, न्यूजर्सीबाबत बोलायचे. मात्र, आता या शर्यतीत माझा भारत देशदेखील मागे नाही, असे गौरवोद्गार यावेळी मोदी यांनी काढले.
या सोहळ्यात बोलताना मोदींनी विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. “नववी ते बारावी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मेट्रोच्या कामांबाबत विचारले पाहिजे. त्यासाठी लागणारा खर्च, बोगद्यांचे बांधकाम याविषयी त्यांना प्रश्न पडले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना जबाबदारीचे भान तर राहणारच शिवाय सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनांमध्ये ते सहभाग घेणार नाहीत. अशाप्रकारे नुकसान झाल्यास स्वत:च्या मालमत्तेचे नुकसान झाल्यासारखा त्यांना त्रास होईल”, असे मोदी यावेळी म्हणाले.
‘वंदे भारत’ एक्सप्रेसमध्ये एकूण १ हजार १२८ प्रवासी क्षमता आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर धावली. त्याचवेळी दुसरी ट्रेन नवी दिल्ली ते श्री वैष्णोदेवी माता, कटरा मार्गावर चालवण्यात आली होती.
ट्रेनमध्ये काय आहेत सुविधा?
ही ट्रेन पूर्णपणे वातानुकुलीत(एसी) आहे. याशिवाय ट्रेनमध्ये जागोजागी चार्जिंग पॉईंट, स्लाईडिंग विंडो, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, अटेंडेंट कॉल बटन, स्वयंचलित दरवाजे, बायो-टॉयलेट, सीसीटीव्ही, आरामदायी आसन व्यवस्थसह इत्यादी बाबींचा ट्रेनमध्ये समावेश करण्यात आला आहे. स्वदेशी सेमी-हायस्पीड म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन अवघ्या ५२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठते. प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनमध्ये स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे तसेच टच फ्री स्लाइडिंग दरवाजे बसवले आहेत.