म्युनिक : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी येथे जी ७ शिखर परिषदेसाठी आगमन झाले. जागतिक नेत्यांबरोबर आपली हवामान, ऊर्जा, अन्नसुरक्षा, दहशतवादविरोधी उपाययोजना, लिंगसमानता आणि लोकशाही मूल्ये या विषयांवर फलदायी चर्चा होईल, असे अपेक्षित असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
२६ आणि २७ जून रोजी होत असलेल्या जी ७ परिषदेसाठी मोदी येथे आले आहेत. त्यासाठी त्यांना जर्मनीचे चॅन्सेलर ओल्फ शोल्झ यांनी आमंत्रित केले आहे. जी ७ हा जगातील सात प्रमुख अर्थसत्ता असलेल्या देशांचा गट आहे.
म्युनिकमध्ये मोदी यांचे आगमन होताच येथील अनिवासी भारतीय नागरिक, संघटनांनी त्यांचे जोरदार स्वागत केले, असे बर्लिनमधील भारतीय दुतावासाने ट्विटरवर म्हटले आहे.
युक्रेन पेचामुळे निर्माण झालेला भूराजकीय संघर्ष आणि त्यातून आलेला ऊर्जा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न यावर जी ७ देशांचे नेते प्रामुख्याने चर्चा करतील, अशी शक्यता आहे.
मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, या परिषदेत आपण सहयोगी देशांचे नेते आणि अभ्यागत आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याबरोबर विद्यमान आव्हाने जसे की पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्नसुरक्षा, आरोग्य, दहशतवादविरोधी उपाययोजना, लिंगसमानता आणि लोकशाहीची जपणूक यावर चर्चा करणार आहोत.
भारताचे परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वारा यांनी सांगितले की, जी ७ नेत्यांबरोबर मोदी यांचा विचारविनिमय, द्विपक्षीय चर्चा होण्याबरोबरच अन्य पाहुण्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींसोबतही बैठका होतील.
अमिरातीचाही दौरा
२८ जून रोजी मोदी हे संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करतील. आखाताचे माजी अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नह्यान यांचे १३ मे रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोदी तेथे जात आहेत.
भारतीय समुदायाची भेट
जर्मनी दौऱ्यानिमित्त आपण युरोपमध्ये पसरलेल्या भारतीय समुदायाच्या लोकांना भेटणार आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या भारतीयांनी युरोपची स्थानिक अर्थव्यवस्था समृद्ध करण्याबरोबरच युरोपीय देश आणि भारत यांच्यातील स्नेहबंध वृद्धिंगत केले आहेत, असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले आहेत.