पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौरा आटपून आता ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज (१० जुलै) सकाळीच ते ऑस्ट्रियात दाखल झाले. दरम्यान, ऑस्ट्रियात पोहोचल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तिथे काही ऑस्ट्रियन कलाकारांनी पाश्चिमात्य वाद्यांच्या सहाय्याने वंदे मातरम् हे गीत गाऊन मोदी यांचं स्वागत केलं. मोदी सध्या व्हिएनामधील हॉटेल रिट्ज-कार्लटनमध्ये थांबले आहेत. गेल्या ४१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी १९८३ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑस्ट्रियाचा दौरा केला होता. मोदी यांनी व्हिएनात दाखल झाल्यानंतर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हा दौरा खूप स्पेशल असल्याचं सांगितलं आहे.
मोदी या दौऱ्यावर ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. मोदी यावेळी ऑस्ट्रियन आणि भारतीय व्यावसायिकांना संबोधित करतील. ऑस्ट्रिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोदी म्हणाले, लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या सामाजिक मूल्यांच्या पायावर दोन्ही देश आणि आपली भागिदारी निर्माण होत आहे.
हे ही वाचा >> रशियाकडून सर्वोच्च पुरस्काराने सन्मान; मोदी म्हणाले, “हा १४० कोटी भारतीयांचा…”
दरम्यान, ऑस्ट्रियाचे चान्सलर नेहमर यांनी देखील मोदींबद्दल एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी पुढच्या आठवड्यात व्हिएनामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यांचा हा दौरा एक विशेष सन्मान आहे. कारण गेल्या ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखादे भारतीय पंतप्रधान आपल्या देशाच्या दौऱ्यावर येत आहे. भारताबरोबरच्या आपल्या राजकीय संबंधांना यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. मोदींच्या या दौऱ्यावेळी आपण या पंच्याहत्तरीचा उत्सव साजरा करू.
हे ही वाचा >> युद्धाने प्रश्न सुटत नाहीत! भारत-रशिया शिखर परिषदेदरम्यान मोदी यांचे खडेबोल
मोदींकडून आभार व्यक्त
मोदी यांनी नेहमर यांच्या एक्सवरील या पोस्टला उत्तर दिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, “चान्सलर कार्ल नेहमर यांचा मी आभारी आहे. या ऐतिहासिक प्रसंगी मी ऑस्ट्रियाला भेट देतोय आणि ही माझ्यासाठी खरोखरच खूप सन्मानाची गोष्ट आहे. उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी आमच्यात सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.”