पीटीआय, नवी दिल्ली : कारागीर आणि शिल्पकारांसाठी केंद्र सरकारने आणलेल्या ‘पीएम विश्वकर्मा योजने’चा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाला. प्रत्येकाला सन्मानजनक जीवन देण्यासाठी सर्वदूर सुविधा पोहोचवण्याची ‘मोदींची हमी’ (मोदी की गॅरंटी) आहे, प्रतिपादन यावेळी पंतप्रधानांनी केली. नव्याने उभारलेल्या ‘यशोभूमी’ या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्राचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान मोदी देशभरातील कारागीर आणि शिल्पकारांना ‘विश्वकर्मा’ संबोधून म्हणाले, की ज्याप्रमाणे शरीरात जसा पाठीचा कणा असतो, त्याचप्रमाणे ‘विश्वकर्मा’ आहेत. समाजजीवनात त्यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. ‘यशोभूमी’ हे केंद्र समृद्धीचा पाया रचणाऱ्या देशातील प्रत्येक श्रमिक आणि विश्वकम्र्याला समर्पित असल्याचे ते म्हणाले. ‘पीएम्ॅच्च विश्वकर्मा’ ही योजना लाखो कारागिरांसाठी आशेचा किरण आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की लोहार असो की शिंपी किंवा अन्य कारागीर असो, त्यांचे महत्त्व कधीच संपणार नाही. जगाने कितीही प्रगती केली आणि तंत्रज्ञान कुठेही पोहोचले तरी कारागिरांचे महत्त्व कायमच राहील.
‘फ्रीज’च्या जमान्यातही लोकांना माठातील पाणी प्यायला आवडते.. अशा या विश्वकर्मा साथीदारांना स्वत:ची ओळख मिळवून देणे आणि त्यांना सर्वतोपरी साथ देणे ही काळाची गरज आहे. जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेत सहभागी जागतिक स्तरावरील नेत्यांना विश्वकर्मा कारागिरांच्या हातांनी बनवलेल्या वस्तू प्रदान करण्यात आल्या. यातून स्थानिक स्तरावर वस्तू निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा संकल्प दिसतो, असे मोदी म्हणाले. दरम्यान, मोदींनी ‘इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर’ या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्र ‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. तसेच दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस मार्गिकेवरील द्वारका सेक्टर २१ ते सेक्टर २५ पर्यंतच्या विस्तारित टप्प्याचे उद्घाटनही केले.
योजना काय आहे?
‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा उद्देश कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक पाठबळ देणे व स्थानिक उत्पादने, कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून परंपरा, संस्कृती आणि वारसा जिवंत ठेवणे हा आहे. यात १८ पारंपरिक कलाकुसरींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी २०२३-२४ ते २०२७-२८ या आर्थिक वर्षांसाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत बायोमेट्रिक पद्धतीने ‘पीएम विश्वकर्मा पोर्टल’वर नोंद करून ‘पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र’ आणि ओळखपत्र दिले जाईल. तसेच कौशल्य विकासासाठी मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण व तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.
बँक तुमच्याकडून हमी मागणार नाही कारण मोदी तुमची हमी देतात. कोणतीही हमी न मागता तुम्हाला तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल आणि त्यावर अत्यल्प व्याज आकारले जाईल, याचीही काळजी घेण्यात आली आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान