अवघ्या तीन दिवसांत हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकीकडे भाजपानं सत्ता कायम राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली असताना दुसरीकडे काँग्रेसनं भाजपाला दे धक्का देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.त्यामुळे हिमाचल प्रदेशमधलं राजकीय वाचावरण आता चांगलंच तापलं आहे. येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशमधील कांग्रा भागात प्रचार करत आहेत. यादरम्यान, चांबी परिसरातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात पंतप्रधानांनी एका रुग्णवाहिकेसाठी आपला ताफा थांबवल्याचं दिसत आहे.
नेमकं झालं काय?
चांबी परिसरात झालेल्या प्रचारसभेनंतर सभास्थळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा हेलिपॅडच्या दिशेने निघाला. मात्र, तेवढ्यात एक रुग्णवाहिका या ताफ्याच्या मार्गात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा आधी थांबवण्यात आला आणि रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. वेगाने ही रुग्णवाहिका समोरच्या रस्त्यावरून निघून गेल्यानंतर मोदींचा ताफा आपल्या निश्चित स्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाला.
गेल्या आठवड्याभरात हिमाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही दुसरी सभा होती. सुजानपूर आणि चांबी या भागांमध्ये मोदींनी आज प्रचार केला. गेल्या आठवड्यात ५ नोव्हेंबर रोजी मोदींनी सुंदरनगर आणि सोलन या भागातील प्रचारसभांमधून विरोधकांवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं.