JD Vance and PM Narendra Modi : भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी सोमवारी (२१ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी व्हॅन्स यांच्याबरोबर अमेरिकेच्या सेकेंड लेडी उषा व्हॅन्स आणि त्यांची तिन्ही मुलं इवान, विवेक व मिराबेलही उपस्थित होती. मोदी यांनी व्हॅन्स कुटुंबाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मोदी यांनी व्हॅन्स कुटुंबियांबरोबरचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. दरम्यान, मोदींना भेटल्यानंतर व्हॅन्स कुटुंब जयपूरला रवाना झालं आहे.
एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की नरेंद्र मोदी व अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला. तसेच दोघांनी भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार करारातील प्रगतीचं स्वागत केलं. त्याचबरोबर परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक व जागतिक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.
व्हॅन्स व मोदी यांच्यात काय चर्चा झाली?
दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर सरकारतर्फे जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी व व्हॅन्स यांनी ऊर्जा, संरक्षण व धोरणात्मक तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूने चालू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी अमेरिका व भारतामधील द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याचं सकारात्मक मूल्यांकन केलं.
टॅरिफच्या मुद्द्यावर तोडगा निघाला का?
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या घरी जे. डी. व्हॅन्स व कुटुंबासाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. दोन्ही नेते अजून एका द्विपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत टॅरिफ (आयात शुल्क), दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षणासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. व्हॅन्स कुटुंब चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेलं असून काल या दौऱ्याचा पहिलाच दिवस होता. अमेरिकेने भारतासह जगभरातील विविध देशांवर परस्पर आयात शुल्क (रेसिप्रोकल टॅरिफ) लावलं आहे. त्यावर अद्याप मोदी व व्हॅन्स यांच्यात चर्चा झालेली नाही. या महत्त्वाच्या विषयावर दोन नेते काय चर्चा करतात. टॅरिफ मुद्द्यावर काही तोडगा काढतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही नेते टॅरिफ मुद्द्यावर काय तोडगा काढतात याकडे भारत व अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांचं लक्ष लागलं आहे.