अमेरिका दौरा आटोपल्यानंतर शनिवारी २४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीन दोन दिवसांच्या इजिप्तच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान अमेरिकेप्रमाणेच मोदी इजिप्तमधील मान्यवर आणि राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेणार आहेत. या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कैरोमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी कैरोमधील भारतीयांप्रमाणेच काही इजिप्त नागरिकही हॉटेलमध्ये उपस्थित होते. यावेळी एका इजिप्शियन महिलेनं मोदींच्या स्वागतासाठी चक्क शोले चित्रपटातलं एक हिंदी गाणं गायलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या महिलेच्या गायनाचं कौतुक केलं.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कैरोमधील रिट्ज कार्लटन हॉटेलमध्ये आगमन झालं, तेव्हा स्थानिक भारतीयांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. यावेळी जेना नावाच्या एका इजिप्शियन महिलेनं शोले या बॉलिवूड चित्रपटातलं ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ हे गाणं गायलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘तुम्ही भारतात कधी गेल्या आहात का?’ अशी विचारणा केली असता या महिलेनं आपण कधीच भारतात गेलो नसल्याचं सांगितलं. तसेच, वयाच्या ६व्या वर्षापासून बॉलिवूडमधील गाणी गात असल्याचंही या महिलेनं एएनआयशी बोलताना सांगितलं.
कोण आहे जेना?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे सादर करणारी जेना ही इजिप्शियन महिला गायक आहे. लहानपणापासूनच तिला गाण्याची आवड असून विशेषत: बॉलिवूड चित्रपटांची गाणी गायला तिला आवडतं.
मोदींसमोर सादर केलेल्या शोले चित्रपटातील गाण्याप्रमाणेच नंतर तिनं ‘लग जा गले’ हे गाणंही माध्यमांसमोर म्हणून दाखवलं!