PM Modi In Wayanad Landslide : काही दिवसांपूर्वी देवभूमी म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये निसर्गाचे थैमान पाहायला मिळालं होतं. वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३० जुलै रोजी भीषण भूस्खलनाची घटना घडली होती. या दुर्घटनेत ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर आता पंतप्रधान मोदी यांनी केरळमध्ये पोहोचत भूस्खनल प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे.

पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी आज केरळ दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी भूस्खलन प्रभावित क्षेत्रांची पाहणी केली आहे. त्यानंतर ते नागरिकांच्या पूर्नवसनासंदर्भातील परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहेत. याशिवाय रुग्णालयात दाखल जखमी नागरिकांची भेट घेणार असून भूस्खलन प्रभावित राहत असलेल्या निर्वासित छावण्यांनाही भेट देणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या भेटीनंतर पंतप्रधान मोदी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा – बेली ब्रिज म्हणजे काय? वायनाड दुर्घटनेनंतर असा पूल उभारण्याची गरज का भासली?

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी वायनाडमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींनी या घटनेला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावं, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – “आई-बाबा सॉरी, हे हॉस्टेलवाले…”, UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या!

३० जुलै रोजी घडली होती भूस्खलनाची घटना

दरम्यान, केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये ३० जुलै रोजी भूस्खलनाची घटना घडली होती. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. तसेच या भूस्खलनात ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. ही आपत्ती घडल्यानंतर लष्कराच्या तुकड्या, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF), तटरक्षक दल, नौदल यांच्याकडून तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात होते. तसेच पंतप्रधान मोदी यांनीही केरळला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं होतं.