ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल हा राफेल करारातही सौदेबाजी करत होता असे वाचनात आले, या मिशेलमामाच्या सौदेबाजीमुळेच यूपीए सरकारच्या काळात राफेल करार खोळंबला होता का?, असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना विचारला.
राफेल करारावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘चौकीदार चोेर है’, असे सांगत राहुल गांधी थेट मोदींना लक्ष्य करत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील सभेत नरेंद्र मोदी यांनी ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यावरुन राहुल गांधी आणि काँग्रेसवर पलटवार केला. मोदी म्हणाले, मी वर्तमानपत्रात वाचलं होते की हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलालाला परदेशातून भारतात आणण्यात आले. तो दलाल फक्त हेलिकॉप्टर घोटाळ्यात नव्हता तर यापूर्वीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत ज्या राफेल कराराची चर्चा सुरु होती, त्या करारातही या दलालाची सौदेबाजी करत होता. या दलालामुळेच यूपीएच्या काळात राफेल करार खोळंबला का?, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपास यंत्रणा शोधत आहे. देशातील जनताही याचे उत्तर मागत आहे. या दलालांमध्ये त्यांचा एक शुभचिंतकही आहे. देशाच्या सुरक्षेचा त्यांनी जो खेळ मांडला त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल, असेही मोदींनी सांगितले.
कहीं मिशेल मामा की सौदेबाज़ी से ही वो डील रुक तो नहीं गई थी ?: PM
इन तमाम सवालों का जवाब जांच एजेंसियां तो ढूंढ ही रही हैं,
देश की जनता भी जवाब मांग रही है।
बिचौलियों के जो भी हमदर्द हैं,
उनको देश की सुरक्षा से किए गए खिलवाड़ का जवाब देना ही होगा: PM
— PMO India (@PMOIndia) January 9, 2019
जी लोक सत्तेला आपला जन्मसिद्ध अधिकार समजत होते, आता त्याच लोकांना कर बुडवल्यापासून ते संरक्षण करारातील लाचखोरीवर उत्तर द्यावं लागत आहे, चोरी करणारे आणि लुटणाऱ्यांचे दुकान बंद करण्यात आले. आता गरीबांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होत आहे, असा दावा मोदींनी केला.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियन मिशेल याने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकताच दिल्ली न्यायालयात केला होता. या पार्श्वभूमीवर मोदींनी मिशेलचा उल्लेख मिशेलमामा असा करत गांधी कुटुंबाला चिमटा काढला आहे.