कावरत्ती :‘‘लक्षद्वीपचा द्वीपसमूह आकारमानाने लहान असला तरी त्याचे हृदय मात्र विशाल आहे,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील तंत्रज्ञान, ऊर्जा, जलसंपदा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक हजार १५० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान  बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी सरकारने सुरू केलेल्या सुधारणांविरुद्ध लक्षद्वीपमध्ये मोठया प्रमाणात नाराजी असून, सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. मुस्लीमबहुल लक्षद्वीपवासीयांची मने जिंकण्यासाठी मोदींनी ही प्रशंसा केल्याचे मानले जात आहे. या सोहळयात महिला-मुलांसह शेकडो लक्षद्वीपवासीय सहभागी झाले होते. त्यांना मल्याळम भाषेत ‘माझ्या परिवारातील सदस्य’ असे संबोधून मोदींनी भाषणाचा प्रारंभ केला.

हेही वाचा >>> “मंदिर बांधलं, उद्घाटनाची तारीखही सांगितली, तरी काँग्रेसच्या मनात….”; खासदार साध्वी निरंजन ज्योती यांची टीका

लक्षद्वीपचे सौंदर्य शब्दातीत असल्याचे सांगून येथील रहिवाशांना भेटण्यासाठी गती, बंगारम आणि कावरत्ती येथे जाण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले. ते म्हणाले, की लक्षद्वीपचे भौगोलिक क्षेत्र भलेही छोटे असेल पण लोकांची हृदये समुद्रासारखी विशाल आणि खोल आहेत. मला येथे मिळत असलेले प्रेम आणि आशीर्वादामुळे मी भारावून गेलो आहे. मी तुम्हा सर्वांप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत लक्षद्वीपसाठी विशेष योजना विकसित करण्याची घोषणा मोदीं यावेळी केली. ज्यात लक्षद्वीपच्या खास आकर्षक पर्यटन स्थळांचा समावेश असेल, अस सांगून पंतप्रधानांनी कदमत आणि सुहेली बेटांवरील दोन ‘ब्ल्यू-फ्लॅग’ समुद्रकिनारे आणि आगामी ‘वॉटर व्हिला’ प्रकल्पांचाही उल्लेख केला. लक्षद्वीप हे मुख्य ‘क्रूझ पर्यटन स्थळ’ म्हणून उदयास येत आहे, पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत पाच पटीने वाढ झाली आहे.

यावेळी पंतप्रधानांनी नागरिकांना प्रवास करून आपल्या देशाची माहिती घेण्याचे आवाहन केले. जगभरात पर्यटनाचा विचार करण्यापूर्वी देशातील किमान १५ ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. विशेषत: लक्षद्वीपला भेट देण्याची शिफारस करताना मोदींनी सांगितले की लक्षद्वीपचे सौंदर्य अनेक जागतिक ठिकाणांनाही मागे टाकते. एकदा  लक्षद्वीपचे सौंदर्य अनुभवल्यानंतर जगातील अन्य ठिकाणे त्या समोर तुम्हाला फिकी वाटतील.

हेही वाचा >>> रामराज्याचा आदर्श! ‘या’ राज्यात २२ जानेवारीला असणार ‘ड्राय डे’, सुशासनाचा आठवडाही साजरा

पंतप्रधानांनी यावेळी हज यात्रेकरूंसाठी सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख केला. यामुळे लक्षद्वीपवासीयांनाही फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘हज व्हिसा’साठी सुलभता आणि व्हिसा प्रक्रियेचे ‘डिजिटलायझेशन’ आणि महिलांना ‘मेहरम’शिवाय हजला जाण्याची परवानगी या निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. या प्रयत्नांमुळे धार्मिक यात्रा, ‘उमराह’साठी जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ झाल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांकडून आश्वासन..

पंतप्रधानांनी यावेळी लक्षद्वीपवासीयांना आश्वासन दिले की केंद्र सरकार त्यांचे जीवनमान, प्रवास सुविधा आणि व्यवसायाच्या संधी वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. या कार्यक्रमात मोदींच्या हस्ते ‘लॅपटॉप’ योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकरी आणि मच्छीमारांना ‘पीएम किसान क्रेडिट कार्ड’ही सुपूर्द केले. यावेळी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल आणि लक्षद्वीपचे नायब राज्यपाल प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi inaugurated various development projects at kavaratti in lakshadweep zws