नवी दिल्ली : भारत जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दाखविलेल्या मार्गावर चालला असता, तर आता प्रगतीचा नवा उच्चांक गाठला असता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या पूर्वी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाचे कर्तव्य पथ असे नामकरण करण्यात आले. त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात मोदी बोलत होते. नामांतरामुळे देशाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘‘गुलामगिरीचे प्रतीक असलेला किंग्सवे किंवा राजपथ आता इतिहासात जमा झाला आहे आणि कायमचा पुसला गेला आहे. आता हा कर्तव्यपथ असेल,’’ असे पंतप्रधानांनी सांगितले. जर भारताने सुभाषचंद्र बोस यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले असते, तर देश नवीन उंचीवर पोहोचला असता; दुर्दैवाने त्यांना विसरले गेले, असेही पंतप्रधान म्हणाले.
सुधारित मार्ग हा मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. ज्यामध्ये नवे संसद भवन, नवीन सचिवालय, पंतप्रधानांचे निवासस्थान व कार्यालय आणि उपराष्ट्रपतींचे निवासस्थान यांचा समावेश आहे.
‘इंडिया गेट’ येथे नेताजींच्या पुतळय़ाचे अनावरण
* नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘इंडिया गेट’ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २८ फूट उंच पुतळय़ाचे अनावरण केले. हा पुतळा केंद्राच्या १३,४५० कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. काळय़ा रंगाच्या ग्रॅनाइटचा हा पुतळा २८० मेट्रिक टंन वजनाचा आहे. पुतळय़ासाठीचा ग्रॅनाइट तेलंगणातून दिल्लीला नेण्यात आला आणि दोन महिन्यांत पुतळा कोरण्यात आला.
* गेल्या नऊ दशकांतील सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूची उत्क्रांती दाखवणाऱ्या इंडिया गेटच्या आवारातील गॅलरीतही पंतप्रधान फिरले. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, जी किशन रेड्डी, अर्जुन राम मेघवाल, मीनाक्षी लेखी आणि कौशल किशोर आदी उपस्थित होते.