आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशभरातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. निवडणुकांच्या आधी मोदींच्या या गुजरात दौऱ्यावरून राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. या दौऱ्यात मोदींनी देशातील सर्वात मोठ्या केबल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. त्याशिवाय, राजकोटमध्ये गुजरातमधील पहिल्या एम्सचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन या दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलं आहे.
देशातला पहिला ‘सुदर्शन सेतू’!
गुजरातल्या द्वारकेमध्येम मोदींच्या हस्ते ‘सुदर्शन सेतू’चं उद्घाटन करण्यात आलं. हा भारतातला सर्वात लांब केबल ब्रिज आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ९७९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ओखा आणि बेयट येथील द्वारका बेटांदरम्यान हा पूल बांधण्यात आला आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी, अर्थात २०१७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पुलाच्या बांधकामासाठीचं भूमिपूजन केलं होतं. जुन्या आणि नवीन द्वारकेमधील महत्त्वाचा धागा म्हणून हा ब्रिज काम करेल, असं मानलं जात आहे.
४.७७ किलोमीटर लांबीचा केबल ब्रिज!
आज उद्घाटन झालेल्या सुदर्शन सेतूची एकूण लांबी ४.७७ किलोमीटर तर रुंदी २७.२० मीटर इतकी असून हा चार पदरी रस्ता आहे. या रस्त्याच्याही दोन्ही बाजूला साधारणपणे अडीच मीटर लांबीचे पदपथ आहेत. यातील फुटपाथच्या बाजूला भगवद गीतेतील श्लोक आणि प्रभू श्रीकृष्णाची छायाचित्रं लावण्यात आली आहेत.
या पुलाला ‘सिग्नेचर ब्रिज’ असंही म्हटलं जायचं. आता त्याचं नाव ‘सुदर्शन ब्रिज’ ठेवण्यात आलं आहे. द्वारका शहरापासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर ओखा द्वीप असून या पुलामुळे ही दोन्ही ठिकाणं जोडली गेली आहेत. याच ठिकाणी प्रभू श्रीकृष्णाचं प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरही आहे.