PM Narendra Modi And Amir of Qatar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांनी १७-१८ फेब्रुवारी २०२५ रोजी भारताचा दौरा केला. यावेळी अमीर यांच्यासोबत त्यांचे मंत्री, अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळही होते. पंतप्रधान मोदी यांनी १८ फेब्रुवारी रोजी हैदराबाद हाऊस येथे अमीर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी ‘द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी स्थापना करारा’वर स्वाक्षऱ्या केल्या.

नव्याने स्थापित झालेल्या धोरणात्मक भागीदारीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, ऊर्जा, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यासह सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे मान्य केले. तसेच यावेळी सुधारित दुहेरी कर टाळण्याच्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

पंतप्रधान मोदींची पोस्ट

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी बैठक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले, “आज माझे बंधू, कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी बैठक झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली कतारने प्रगतीची नवी उंची गाठली आहे. ते भारत-कतारमधील मजबूत मैत्रीसाठी देखील वचनबद्ध आहेत. ही भेट आणखी खास आहे कारण आम्ही आमचे संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढवले ​​आहेत.”

पतंप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “आमच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा प्रमुख होता. आम्हाला भारत-कतार व्यापार संबंध वाढवायचे आहेत आणि त्यामध्ये विविधता आणायची आहे. दोन्ही ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया, औषधनिर्माण आणि ग्रीन हायड्रोजन यासारख्या क्षेत्रातही एकत्र काम करू शकतात.”

या मुद्द्यांवर चर्चा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्यात झालेल्या बैठकीबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “भारत आणि कतारमधील पारंपारिक संबंध अधिक दृढ झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांनी आज हैदराबाद हाऊस येथे विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-कतार संबंधांना व्यापार, ऊर्जा, गुंतवणूक, नवोपक्रम, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा आणि संस्कृतीक संबंधांवर लक्ष केंद्रित करून धोरणात्मक भागीदारीमध्ये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली.”

Story img Loader