अवघ्या काही महिन्यांवर २०२४ च्या लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागल्याचं चित्र दिसत आहे. देशातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपाकडून तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून मोदींसमोर विरोधकांचा चेहरा शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिटिश वृत्तपत्र फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीची सध्या चर्चा चालू आहे. या मुलाखतीमध्ये मोदींनी भारताशी निगडित वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
२०२४मध्ये पुन्हा सत्ता येण्याचा विश्वास!
यावेळी मुलाखतीतील प्रश्नांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२४ मध्ये पुन्हा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला. “देश सध्या मोठी भरारी घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. देशातील नागरिकांना ही भरारी घ्यायची असून देशाला इथपर्यंत मजल मारून देण्यात कोणत्या पक्षाची भूमिका राहिली आहे, हे देशवासीयांना माहिती आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.
२०२४मध्ये जिंकल्यास राज्यघटना बदलणार?
विरोधी पक्षांकडून सातत्याने मोदी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच २०२४ साली भाजपा पुन्हा निवडणूक जिंकल्यास मोदी सरकार देशाची राज्यघटनाच बदलून टाकेल, अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या टीकेला मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधकांकडून करण्यात येणारे हे दावे निरर्थक आहेत. मोदी सरकारने राबवलेल्या स्वच्छ भारत ते डिजिटल इंडियासारख्या योजना राज्यघटना बदलून नव्हे तर लोकांच्या सहभागातून यशस्वीरीत्या राबवण्यात आल्या”, असं मोदी म्हणाले.
भाजपाचं मुस्लीमविरोधी धोरण?
दरम्यान, फायनान्शियल टाईम्सनं मोदींच्या मुलाखतीचा सारांश देताना विरोधकांकडून मोदी सरकारवर केल्या जाणाऱ्या आरोपांचा संदर्भ दिला आहे. ‘भाजपा सरकारच्या काळात मुस्लीमविरोधी वक्तव्य मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जातो, शिवाय भाजपाकडे एकही मुस्लीम खासदार किंवा सरकारमधील वरीष्ठ मंत्री नसल्याचाही दावा केला जातो’, असं या वृत्तात नमूद केलं आहे.
यासंदर्भात मुलाखतीत ‘भारतातील मुस्लिमांचं भवितव्य काय? असा प्रश्न विचारला असता मोदींनी त्यावर भाष्य करण्याऐवजी थेट देशातील पारशी समुदायाचं उदाहरण दिलं’, असं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
“जगभरात पारशी समुदायाला छळाचा सामना करावा लागला. पण भारतात मात्र त्यांना सुरक्षित वातावरण मिळालं. इथे ते अत्यंत आनंदात आहेत आणि त्यांची वृद्धी होत आहे”, असं मोदी मुलाखतीत म्हणाले. “यावरून हेच सिद्ध होतं की भारतीय समाजात कोणत्याही धार्मिक अल्पसंख्याकां भेदभावाला स्थान नाही”, असंही मोदींनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तरात सांगितलं.
टीकाकारांना मोदींनी केलं लक्ष्य
दरम्यान, मुलाखतीत टीकाकारांविषयी विचारणा केली असतान मोदींनी त्यावर खोचक टिप्पणी केली. “दररोज आमच्यावर टीका करण्यासाठी भारतात एक आख्खी यंत्रणाच आमच्याकडे असलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरत आहे. संपादकीयांमधून, वृत्तवाहिन्यांमधून, सोशल मीडियावरून, व्हिडीओ-ट्वीट्सच्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. त्यांच्याकडे तो अधिकार आहे. पण इतरांनाही तथ्यांच्या आधारावर उत्तर देण्याचा तेवढाच अधिकार आहे”, असं मोदी आपल्या उत्तरात म्हणाले.